ऑस्ट्रेलियापाठोपाठ अफगाणिस्तानचा पराभव करत टीम इंडियाने वर्ल्डकप स्पर्धेत धमाकेदार सुरुवात केली. आता भारताचा तिसरा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शनिवारी हा सामना होणार असून यासाठी टीम इंडिया गुजरातला रवाना झाली आहे. अशातच या सामन्यापूर्वी शुभमन गिलच्या पुनरागमनाचे एक मोठे अपडेट समोर आले आहे. (Latest Marathi News)
शुभमन गिलच्या प्रकृतीत सुधारणा होत असून तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी अहमदाबादमध्ये दाखल झाला आहे. अहमदाबाद येथील विमानतळावर शुभमन गिल टीम इंडियासोबत (Team India) दिसून आलाय. त्यामुळे तो लवकरच फिट होईल आणि या सामन्यात भारताकडून खेळेल, अशी अपेक्षा क्रिडाप्रेमांनी आहे.
शुभमन गिलला भारतीय संघाचा प्रिन्स म्हणून ओळखलं जातं. त्याच्या फलंदाजीच्या शैलीने सर्वांनाच भारावून सोडलंय. गिलने आशिया चषकात देखील चांगली कामगिरी केली होती. मात्र, ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्याआधी त्याला डेंग्यूची लागण झाली. त्यामुळे विश्वचषकातील सुरुवातीचे दोन सामने तो खेळू शकला नाही.
शुभमन गिलच्या अनुपस्थितीत इशान किशन हा रोहित शर्मासोबत सलामीला आला. मात्र, त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात (IND vs PAK) गिल फिट व्हावा अशी प्रार्थना क्रिडाप्रेमी करीत आहेत. दरम्यान, गिलच्या प्रकृतीबाबत अपडेट देताना बीसीसीआयमधील एका वरिष्ठ सूत्राने सांगितले की, गिलच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
त्याला तंदुरुस्त होण्यासाठी आणि मॅच फिटनेस परत मिळवण्यासाठी पूर्ण वेळ दिला जाणार आहे. सध्या शुभमन गिलवर वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू असून तो लवकरच बरा होऊन संघात सामील होईल, अशी अपेक्षा संघ व्यवस्थापनाला आहे. भारत-पाकिस्तान सामन्याला अजून दोन दिवसाचा कालावधी बाकी आहे. तोपर्यंत गिल पूर्णपणे तंदुरुस्त होणार का? याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.