Arjun Tendulkar
Arjun Tendulkar  Saam TV
क्रीडा | IPL

Arjun Tendulkar Team India : अर्जुन तेंडुलकरने ठोठावलाय टीम इंडियाचा दरवाजा?; IPLमध्ये दणक्यात केलीय एन्ट्री

Nandkumar Joshi

Arjun Tendulkar can Make Debut For International Cricket : अर्जुन सचिन तेंडुलकर. सध्या आयपीएलमध्ये अर्जुनच्याच नावाची चर्चा आहे. यंदाच्या आयपीएल मोसमात पदार्पण करणारा अर्जुन फक्त दोन सामने खेळलाय. या दोन्ही सामन्यात त्यानं आपल्या गोलंदाजीनं छाप पाडलीय. पहिल्या सामन्यात विकेट मिळाली नसली तरी, त्यानं टाकलेले चेंडू दिग्गज क्रिकेटपटूंच्या मनाला भेदून गेलेत. तर दुसऱ्या सामन्यात त्यानं अखेरचं षटक टाकताना विकेट घेतली. त्याची गोलंदाजी प्रभावी ठरल्यानं लवकरच तो टीम इंडियात पदार्पण करू शकतो, अशी चर्चा आता क्रिकेट वर्तुळात होऊ लागलीय.

आयपीएलच्या सुरुवातीलाच अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. रणजी स्पर्धेत खेळताना त्यानं गोलंदाजी आणि फलंदाजीतही चुणूक दाखवली होती. त्यामुळं यंदा तरी अर्जुनला संधी मिळेल का, असा प्रश्न काही क्रिकेटप्रेमींकडून सोशल मीडियावर उपस्थित केला जात होता.

अखेर अर्जुन तेंडुलकरला कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात आयपीएल पदार्पणाची संधी मिळाली. मुंबई इंडियन्सकडून गोलंदाजीची सुरुवातच अर्जुन तेंडुलकरनं केली. अवघ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष त्याच्या पहिल्यावहिल्या षटकाकडं लागलं होतं. पहिला चेंडू टाकताच टाळ्यांचा कडकडाट झाला. अर्जुननं पहिल्या षटकात केवळ ५ धावा दिल्या होत्या. तेव्हाच त्यानं अवघ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधून घेतलं. या सामन्यात २ षटके टाकली. त्यात त्याने एकूण १७ धावा दिल्या.

आयपीएलमधील (IPL 2023) दुसरा सामना हा हैदराबादविरुद्ध झाला. या सामन्यात त्यानं एकूण १८ धावा दिल्या. पहिल्या सामन्यातील लय पुन्हा दिसून आली. यात चांगली गोष्ट म्हणजे त्यानं अखेरचं आणि निर्णायकी षटक टाकताना भुवनेश्वर कुमारला बाद करून आयपीएलमधील पहिली विकेटही घेतली.

अर्जुन तेंडुलकरला टीम इंडियात का संधी मिळू शकते, काय असू शकतात कारणं?

२०२१ मध्ये आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने त्याला २० लाखांची बोली लावून खरेदी केलं होतं. पण खेळण्याची संधी मिळाली नाही. २०२२ मध्येही तेच झालं. यंदा २०२३ मध्ये तरी मुंबई इंडियन्सकडून संधी मिळेल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. अखेर त्याला संधी मिळाली आणि त्यानंही संधीचं सोनं केलं. (Sports News)

वडील सचिन तेंडुलकर क्रिकेटविश्वातलं दिग्गज नाव. क्रिकेटचा देव म्हणून ओळख. या सचिनचा मुलगा म्हणून अर्जुन तेंडुलकरची ओळख. पण पहिला तो अर्जुन आहे हे त्यानं स्थानिक क्रिकेटमध्ये सिद्ध करून दाखवलं. गोवाकडून रणजी क्रिकेट खेळताना त्यानं शतकही झळकावलं आणि गोलंदाजीतही कमाल करून दाखवली.

अर्जुन तेंडुलकर राजस्थानविरुद्ध खेळताना सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. ५ बाद २०१ अशी त्यावेळी धावसंख्या होती. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी अर्जुन नाबाद ४ धावांवर खेळत होता. दुसऱ्या दिवशी अर्जुननं सुयश प्रभूदेसाईसोबत भागीदारी रचली. चहापानापर्यंत संघाची धावसंख्या ४०० पार गेली. प्रभूदेसाईनं १५० धावा केल्या तर अर्जुननंही शतकी खेळी केली.

अर्जुन तेंडुलकरची टीम इंडियात का होऊ शकते एन्ट्री?

भारतात गुणवान क्रिकेटपटूंचीही कमी नाही. आयपीएलमध्ये खेळणारे खेळाडू बघितले तर गुणवत्ता ठासून भरलेली दिसते. बहारदार फटकेबाजी आणि गोलंदाजी बघायला मिळते. त्यामुळं स्पर्धा प्रचंड वाढलीय. हार्दिक पंड्या हे एक नाव मोठं आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून तो सध्या टीम इंडियाच्या टी२० संघाचे नेतृत्व करतो आणि वनडे संघाचं प्रतिनिधित्व करतो. पण पंड्यानंतर कोण हा प्रश्न सध्या टीम इंडियाला सतावतोय. विजय शंकर, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर ही नावंही हार्दिक पंड्यानंतर चर्चेत असतात. पण फॉर्म नसणं किंवा दुखापतग्रस्त असणे या कारणांमध्ये ते बऱ्याचदा टीम इंडियात नसतात.

अशा वेळी आता ऑलराउंडर क्रिकेटपटूंच्या यादीत अर्जुन तेंडुलकरचं नाव सामील होण्याची शक्यता आहे. केवळ तेंडुलकर आडनाव आहे म्हणून नव्हे, तर त्याच्याकडील गुणवत्तेनं त्याने ते दाखवून दिले आहे. त्याने आपल्या छोट्याशा कारकिर्दीत दाखवून दिलं आहे. चेंडू स्विंग करण्याची क्षमता त्याच्यात आहे. फलंदाजीतही त्यानं शतकी खेळी करून स्वतःला सिद्ध करून दाखवलंय.

अर्जुनच्या फॉर्मकडे सिलेक्टर्सचं लक्ष

अर्जुन तेंडुलकरनं आयपीएलमध्ये पदार्पण केलंय. मुंबई इंडियन्सनं त्याला दोन्ही पर्वात संधी दिली नव्हती. पण स्थानिक क्रिकेटमध्ये त्यानं चुणूक दाखवली आणि शेवटी २०२३ च्या आयपीएलमध्ये त्याला संधी मिळाली. पहिल्या दोन सामन्यांत त्यानं उत्तम कामगिरी केलीय. पुढेही त्याच्याकडून अशीच कामगिरी झाली तर त्याच्यासाठी खूप मोठं यश असेल.

अर्जुन तेंडुलकरनं २०२२ च्या मुश्ताक अली टी २० करंडक स्पर्धेत ७ डावांत १० विकेट घेतल्या. इकॉनॉमी रेट ५.६९ इतकंच होतं. गोव्याकडून खेळताना दुसरा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरलाय. विजय हजारे ट्रॉफीमध्ये अर्जुननं ८ डावांत ७ विकेट घेतल्यात. ३२ ची सरासरी, ४.९८ च्या इकॉनॉमी रेटने त्याने धावा दिल्या. त्यामुळं आयपीएलमधील कामगिरीवर सिलेक्टर्सचं लक्ष असेल.

नवोदितांना संधीची दारं झालीयेत खुली

गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियाच्या टी २० आणि वनडे संघातून खेळण्याची अनेक नवोदितांना संधी देण्यात आली आहे. बऱ्याच गुणवान खेळाडूंना आजमावून बघितले आहे. शॉर्ट फॉरमॅटमध्ये अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात येत आहे. वर्कलोड मॅनेजमेंटचं धोरण व्यवस्थापनानं अवलंबल्याचं दिसतंय. अशावेळी नवोदित चेहऱ्यांना सिलेक्टर्सना प्रभावित करण्याची नामी संधी चालून आली आहे.

अर्जुनला भविष्यात संधी मिळाली तर आश्चर्य वाटू नये. मध्यमगती गोलंदाज आणि त्यात चेंडू वळवण्याची कला त्याला आत्मसात असल्याचं दिसतंय. अशा प्रकारची गोलंदाजी शैली आणि अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करण्याची क्षमता असलेला ऑलराउंडर रविंद्र जडेजा आणि हार्दिकनंतर सध्या तरी टीम इंडियाकडं दिसत नाही. त्यामुळं सिलेक्टर्सच्या नजरेसमोर अर्जुन तेंडुलकर आला तर वावगे ठरणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

SCROLL FOR NEXT