ground report West Bengal elections saam tv marathi
देश विदेश

ममतांच्या बंगालमध्ये ९२% विक्रमी मतदान, पण मुद्दे मात्र गायब; नेमकं कोणाचं पारडं जड? वाचा ग्राऊंड रिपोर्ट

ground report West Bengal elections : पश्चिम बंगाल निवडणुकीत मतदार यादीतील नाव वगळण्याचा वाद, बेरोजगारी आणि अस्मितेचे राजकारण हे प्रमुख मुद्दे ठरले आहेत. ग्राउंड रिपोर्टमधून मतदारांच्या भावना जाणून घ्या.

Bharat Mohalkar, Namdeo Kumbhar

West Bengal election result 2026 : "मैं आपको बांगलादेशी मुसलमान या रोहिंग्या दिखता हूं क्या? मैं बंगाली ब्राह्मण हूं. मैं, मेरा बाप, दादा, सब यहाँ पैदा हुए, काम यहाँ किया और ये सरकारने हमारा ही वोटिंग का अधिकार छीन लिया," हे संतापाने लालबुंद झालेल्या कोलकात्यातील दीपांकर भट्टाचार्य यांचे शब्द...

पश्चिम बंगाल निवडणुकीआधी राबवण्यात आलेल्या 'SIR' प्रक्रियेत दीपांकर यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले. बोलता बोलता त्यांनी आधार, मतदान आणि पॅन कार्डसह स्वतःचा जन्मदाखलाही समोर ठेवला. १९७१ मध्ये कोलकात्यात जन्मलेल्या दीपांकर यांच्या डोक्यावरचे वडिलांचे छत्र लहानपणीच हरपले, तर २०१७ मध्ये आईचेही निधन झाले. १९९५ मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी तिथेच नोकरी पत्करली, लग्न केले. आता त्यांची मुलेही मोठी झाली आहेत; मात्र या संपूर्ण कुटुंबालाच 'SIR' मधून वगळण्यात आले.

हा केवळ दीपांकर यांचा मुद्दा नाही, तर कोलकात्याच्या 'महाराष्ट्र निवास'मध्ये काम करणाऱ्या जोशींचाही यात समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये तब्बल ९१ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली असून, हा निवडणुकीतील प्रचाराचा कळीचा मुद्दा ठरला. वगळलेल्या ९१ लाखांपैकी ६३ टक्के हिंदू तर ३४ टक्के मुस्लिम मतदार आहेत. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये भाजपविरोधात मोठा संताप होता. म्हणूनच, गेल्या १० वर्षांपासून मुंबईत काम करणारा शामली दास हा तरुण, 'आता मतदानाला गेलो नाही तर पुढच्या वेळी नाव कायमचे वगळले जाईल' या भीतीने थेट बंगालमध्ये पोहोचला होता. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत साम टीव्हीचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांनी थेट मैदानात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला, तिथे आलेला अनुभव त्यांनी आपल्या शब्दातून मांडलाय.

बंगालच्या रस्त्यांवर फिरताना आणि लोकांशी गप्पा मारताना संमिश्र प्रतिक्रिया मिळत होत्या. मुंबईतून आलेले मतदार, उच्चशिक्षित तरुण आणि उत्तर भारतीय पंडित, गुजराती, मारवाडी व्यापारी बदलाची भाषा करत ममता सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करत होते. दुसरीकडे, स्थानिक तरुणी आणि गरीब महिला 'बंगाल की नारी, सब पर भारी' असा नारा देत होत्या. यामागील कारण विचारले असता, "मोमता दीदी हमारे बारे में सोचता है, लाडकियों को शिक्षा के लिये मदत करता है," अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

ऑनलाईन टॅक्सी सेवा देणाऱ्या तरुणांसोबतही मी चर्चा केली. अंकित नावाचा पदवीधर तरुण संतापून म्हणाला, "मोमता दीदी की वजह से ही बंगाल का बुरा हाल हुआ है... यहाँ कोई जॉब नहीं, कोई कंपनी नहीं आ रही.. हम पढ़कर भी हमें रॅपिडो चलाना पड़ता है.. तो आप बताओ क्यूँ चाहिए ममता बॅनर्जी?" या संतप्त प्रतिक्रियेने मलाही अंतर्मुख केले. कारण, येथील सुशिक्षित तरुणांमधील बेरोजगारीचे प्रमाण ९ ते १७ टक्क्यांवर पोहोचले आहे. एवढेच नाही, तर महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, झारखंड, गुजरात, तामिळनाडू आणि केरळमध्ये स्थलांतर करणाऱ्या मजुरांची संख्या २४ लाखांहून अधिक आहे. यातील बहुतांश तरुणांना राज्यात बदल हवा होता.

लोकांची मते जाणून घेत मी कोलकात्याच्या बाबू घाट परिसरात पोहोचलो. तिथे नाव चालवणारा दार्जिलिंगचा बिजॉय लेपचा सांगत होता, "बडे भैय्या आप बताओ की ७ हजार में कैसे जिंदगी काटूं? यहाँ खा-पीकर ७ हजार मिलते है, उसमें से ६ हजार गाँव भेजता हूं, हजार रुपये खुद के लिये रखता हूं, इसी लिये हमें बदल चाहिए."

दुसरीकडे, बडी मंडी आणि न्यू मार्केट भागात फिरताना व्यापाऱ्यांमध्ये भाजप आणि मोदींबद्दल प्रचंड राग जाणवला. "बाहर के लोग हमारी अस्मिता पे हमला कोर रहा है, हम शांती से रहते है, पर सत्ता बदलेगी तो भाजप हमारे दुकान तोड़कर वहाँ बड़े दुकान बनवायेगा, पर उस दुकान में हमारे लिये जगह नहीं होगी," अशी भीती छोट्या बंगाली आणि मुस्लिम व्यापाऱ्यांमध्ये होती. मालदा आणि मुर्शिदाबाद भागात तर, भाजपची सत्ता आल्यास आपल्याला बांगलादेशी ठरवले जाण्याची भीती मुस्लिम नागरिक व्यक्त करत होते. राज्यात मुस्लिम समाज ३० टक्के असून, त्यांच्या बहुल भागातून तृणमूल काँग्रेसने तब्बल ८९ जागा जिंकल्या होत्या. मात्र, या भागातील मतदारांची नावे 'SIR' मधून वगळल्याचा मोठा फटका तृणमूलला बसण्याची शक्यता आहे.

संवादादरम्यान काही तरुण बंगाली वारसा आणि हिंदुत्वाची भाषा करत होते. हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित तरुण ममतांवर मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचा आरोप करत होते. तर माथाडी कामगार, हमाल, फुलविक्रेते आणि शेतकरी बंगाली अस्मितेचा नारा देत होते. अमित शहा यांचे 'ये दीदी... ओ दीदी' हे एकेरी वक्तव्य कष्टकऱ्यांना रुचले नव्हते; 'त्यांनी चुकीची भाषा वापरली असून बंगाली जनता त्यांना उत्तर देईल,' असे मत नागरिक मांडत होते. या लढाईत ममतांच्या विरोधात मोदी, शहा, योगी, हेमंत बिस्वा सरमा आणि देवेंद्र फडणवीस यांसारखे दिग्गज नेते मैदानात उतरल्याने, 'ममता विरुद्ध सगळे' अशा स्थितीत काही सामान्यांनी त्यांना साथ देण्याची भूमिका घेतली. भाजपकडून बंगाली अस्मितेवर हल्ले होत असून, त्यांची सत्ता आल्यास दुर्गापूजेलाही मांस-मच्छी खाण्यावर बंदी आणली जाईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. याचाच फायदा घेत ममतांनी हा प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवला. मोदींनी 'झालमुडी' (भेळ) तर ममतांनी 'मछली' प्रचारात आणली. त्यानंतर भाजप नेतेही हातात मासे घेऊन 'जय श्रीराम'चा नारा देताना दिसले. त्यामुळे बंगाली अस्मितेची प्रतीके बदलली जात आहेत का, असा प्रश्नही नागरिक विचारत होते.

संपूर्ण प्रचारात बंगालची अस्मिता ज्या महापुरुष आणि सुधारकांच्या भोवती फिरते, त्या रवींद्रनाथ टागोर, नेताजी सुभाषचंद्र बोस, जतीन दास, बिपिनचंद्र पाल, राजा राममोहन रॉय यांची नावेच प्रचारात नव्हती. त्यामुळे महाराष्ट्रात जसे शिव, शाहू, फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, बिरसा मुंडा, अहिल्यादेवी होळकर ही नावे चवीने वापरली जातात, अगदी तसेच बंगालमध्ये अस्मितेची प्रतीके बदलली जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

भाजपने सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आदिवासी आणि दलित समुदाय आपल्याकडे वळवला. बांगलादेशी घुसखोर, हिंदुत्व, दार्जिलिंगमधील चहा उत्पादकांचे प्रश्न आणि मतुआ समाजाला NRC च्या माध्यमातून हवे असलेले नागरिकत्व, हे मुद्दे त्यांनी चर्चेत ठेवले. याउलट, ममतांनी अस्मितेवरील हल्ला परतवून लावण्याचा नारा देत ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला.

या राजकीय रणधुमाळीत मराठी मतदार मात्र 'सायलेंट' होते. ममता बॅनर्जी मराठी भाषिकांना सतत मदत करतात, तर फडणवीसांनी प्रचारातून वेळ काढून महाराष्ट्र मंडळाला भेट दिली. यामुळे मराठी भाषिकांची अवस्था 'इकडे आड, तिकडे विहीर' अशी झाली होती. दुसरीकडे, ममतांचा मतदारसंघ असलेल्या भवानीपूरमध्ये प्रचंड शुकशुकाट होता; तिथे सायलेंट वोटर मोठ्या प्रमाणात दिसले. अनेकदा कॅमेरा सुरू असताना ममतांचे आणि बंद केल्यावर भाजपचे गुणगान गायले जात होते. कालीघाट परिसरातील मोठ्या प्रमाणावर असलेले उत्तर भारतीय पंडित, गुजराती आणि मारवाडी यांचा कल भाजपकडे असल्याने, ममतांना त्यांच्या 'होम पिच'वर मोठा संघर्ष करावा लागला. तर काही पुजारी उघडपणे भाजपवर टीका करत होते.

ग्रामीण भागातील महिला आणि तरुण ममतांच्या योजनांचे कौतुक करत होते. 'दीदी' महिलांना दीड हजार रुपये, विद्यार्थिनींना सायकली, आरोग्यासाठी हप्ता आणि बेरोजगार तरुणांना दीड हजारांचा भत्ता देतात, यावर ते समाधानी होते. "ममता दीदी डेड हजार देती है और आप तीन हजार की बात करते हो. पर आप को मालूम होना चाहिए की देश में २० राज्य और केंद्र शासित प्रदेशों में BJP/NDA की सरकार है, वहाँ मोदीजी ने ३ हजार क्यूँ नहीं दिया?" असा रोकडा सवाल एका मतदाराने केला.

प्रचार संपल्यानंतर पश्चिम बंगालला लष्करी छावणीचे स्वरूप आले होते. गैरप्रकार टाळण्यासाठी तब्बल २ लाख ४० हजार सशस्त्र जवान दाखल झाले होते. यावरून केंद्रीय अधिकारी आणि मुख्यमंत्री यांच्यात अनेकदा खटके उडाले. "राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना हटवून केंद्रीय सशस्त्र दलाच्या हाती निवडणुकीची सूत्रे देणे हा लोकशाहीवर हल्ला आहे. त्यांचे काम सीमेचे रक्षण करणे आहे, मतदारांचे कार्ड तपासणे नाही," असा आक्षेप ममतांनी नोंदवला. यावर "तृणमूलची गुंडशाही संपवणार," असे प्रत्युत्तर अमित शहा यांनी दिले.

या संपूर्ण निवडणुकीत भाजपने बंगाली अस्मिता, हिंदुत्व, आर.जी. कर महाविद्यालयातील अत्याचार आणि महिला सुरक्षा हे मुद्दे ऐरणीवर आणले. तर ममतांनी महिला व तरुणांचा भत्ता, ग्रामीण योजना आणि बंगालच्या खानपानावर भर दिला. मात्र, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योग, पायाभूत सुविधा आणि जनतेचे राहणीमान उंचावण्यासारखे मूलभूत विषय प्रचारातून गायब होते. असे असूनही मतदारांनी ९२ टक्के विक्रमी मतदान केले. हे मतदान अँटी-इन्कम्बन्सीमुळे झाले की भाजपला रोखण्यासाठी, हे निकालातून स्पष्ट होईलच. मात्र, येणाऱ्या सरकारने रोजगार, शिक्षण आणि आरोग्य हे मुद्दे प्राधान्याने अजेंड्यावर घ्यायला हवेत; अन्यथा नेपाळप्रमाणेच 'जेन झी' (Gen Z) क्रांतीचा उद्रेक बंगालमध्येही होऊ शकतो. बंगाल पुन्हा पेटणार नाही, याची खबरदारी नव्या सरकारने घेणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोलापूरचं 'मिर्झापूर' झालंय का? ७२ तासांत ६ हत्या; कोणाचा गळा चिरला तर कुणाला दगडाने ठेचलं

नसरापुरातील प्रकरणात आरोपीचा संतापजनक दावा; कोर्टात नेमकं काय म्हणाला?

सोलापूर हादरलं! भररस्त्यात ३५ वार, डोकं चेंदामेंदा; चेहरा ओळखणंही कठीण, 'त्या' भयंकर हत्याकांडाचा थरारक Video समोर

Riteish Deshmukh: 'शिवाजी राजेंच्या काळातील चौरंग करण्याची शिक्षा दिली पाहिजे...'; नसरापूर घटनेवरून रितेश देशमुख संतापला

Maharashtra News Live Update : रायगडच्या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी

SCROLL FOR NEXT