IMD heavy rain alert for 13 states, cyclone warning latest weather update : महाराष्ट्रातील विदर्भासह राजस्थान, दिल्ली अन् उत्तर भारतामध्ये गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट आली होती. पण नागरिकांना दिलासा देणारी बातमी हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने १३ राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. जोरदार वाऱ्यासह चक्रीवादळाचा इशारा आयएमडीकडून दिला आहे. पुढील १५ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळू शकतो. या काळात ६६ ते ७० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.
बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तराखंडसह १३ राज्यात पुढील १५ तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामानात बदल होत असल्याने नागरिकांनी सावध राहावे, असा इशाराही देण्यात आला आहे. घराबाहेर पडताना नागरिकांनी एकदा हवामान तपासून घेण्चा सल्लाही दिला आहे. कोणत्या राज्यात कसे असेल हवामान? कुठे उष्णतेचा इशारा तर कुठे पावसाची शक्यता वर्तवली? चक्रीवादळाचा प्रभाव किती असेल? याबाबत जाणू घेऊयात...
राजधानी दिल्ली आणि उत्तर प्रदेशात आज कसे असेल हवामान?
दिल्ली-एनसीआरमध्ये आज उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागेल. २० मे ते २२ मे पर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. २३ मे पासून हवामानात किंचित बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे.
दुसरीकडे उत्तर प्रदेशातही तीव्र उष्णतेने हाहाकार माजवला आहे. बांदा जिल्ह्यात तापमान ४७.६ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. हवामान विभागाने आता पश्चिम आणि पूर्व उत्तर प्रदेशातील अनेक भागांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होण्याचा अंदाज वर्तवला आहे. २० ते २५ मे दरम्यान जोरदार उष्ण वारे वाहण्याची शक्यता आहे. आग्रा, नोएडा, जालौन, बरेली, वाराणसी, प्रयागराज आणि कानपूरसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे.
उत्तराखंडमध्ये अन् बिहारमध्ये काय स्थिती?
हवामान विभागाने बिहारमध्ये २५ मे पर्यंत मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा इशारा दिला आहे. या कालावधीत वारे ताशी ८० किलोमीटर वेगाने वाहू शकतात. राजधानी पाटणामध्ये मेघगर्जना आणि पावसाची शक्यता आहे. पूर्णिया, भागलपूर आणि गया येथेही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
२० ते २३ मे दरम्यान उत्तराखंडमध्ये हवामानात बदल होण्याची दाट शक्यता आहे. अनेक भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडू शकतो. काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थितीही निर्माण होऊ शकते. उत्तरकाशी आणि चमोलीमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो.
महाराष्ट्रात पाऊस पडणार का? राजस्थानात वादळी वारे
गेल्या काही दिवसांपासून विदर्भात उष्णतेची लाट आली आहे, त्यामुळे नागरिक त्रस्त आहे. हवामान विभागाने २०-२१ मे रोजी अकोला, अमरावती आणि वर्धा येथे तीव्र उष्णतेच्या लाटेसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती आणि यवतमाळसह विदर्भाच्या बहुतांश भागांमध्ये येत्या काही दिवसांत उष्णतेपासून दिलासा मिळण्याची कोणतीही चिन्हे नाहीत.
राजस्थानमधील अनेक भागांमध्ये आज तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. जोरदार धुळीचे वारे वाहण्याचीही शक्यता आहे. २० ते २२ मे दरम्यान ताशी ३० किलोमीटर वेगापर्यंतचे धुळीचे वारे वाहू शकते. आठवडाभर राज्याच्या बहुतांश भागांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून तापमानात तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.
इतर राज्यात काय परिस्थिती? पाऊस कोसळणार का?
आज दुपारनंतर ओडिशाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता आहे.
मध्य प्रदेशात २५ मे पर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांमध्ये हलक्या पावसाचीही शक्यता आहे. भोपाळ, ग्वाल्हेर, रेवा, जबलपूर आणि इंदूरमध्ये तीव्र उष्णता जाणवेल.
तेलंगणामध्ये पुढील चार ते पाच दिवसांसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर आणि पूर्व जिल्ह्यांमध्ये तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
पुढील ४८ तासांत हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता आहे . शिमला, मंडी, कुल्लू, कांग्रा आणि उना येथे सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडू शकतो .
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.