उत्तर प्रदेशमधील आगरा प्रजापती ब्रम्हाकुमारी आश्रमात राहणाऱ्या दोन सख्खा बहिणींनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आगरा येथील जगनेर येथील ही घटना असून या घटनेमुळे खळबळ माजली आहे.
आत्महत्येआधी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाने चिठ्ठी लिहिली असून आत्महत्येसाठी संस्थेतील चार जण जबाबदार असल्याचा उल्लेख केला आहे. या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
हे चारही जण पैसे हडप करण्यासह अनैतिक गोष्टींमध्ये सामील असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. एसीपी खैरागढ यांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही संशयित आरोपी आग्राबाहेरील असून त्यातील दोघांना ताब्यात घेतलं आहे. अन्य दोघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकता (वय ३८) आणि शिखा (वय ३२) या दोघी बहिणींनी ८ वर्षांपूर्वी ब्रम्हाकुमारीची दीक्षा घेतली होती. दीक्षा घेतल्यानंतर जगनेरमध्ये ब्रम्हाकुमारीचे केंद्र स्थापन करून त्या याठिकाणी वास्तव्याला होत्या. शिखाने एक पानी चिठ्ठी लिहिली आहे तर एकताने दोन पानांची चिठ्ठी लिहिली आहे. मागच्या एका वर्षापासून अडचणीत असल्याचं शिखाने नमूद केलं आहे. तिने आपल्या आत्महत्येला निरज, धौलपूर येथील ताराचंद, निरजचे वडील आणि ग्वाल्हेरमधील एका आश्रमात राहणारी महिला जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तर एकताने, निरजने केंद्रात राहण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, केंद्राची स्थापना झाल्यानंतर त्याने संपर्क बंद केला होता. एक वर्ष आम्ही दोघी बहिणी अडचणीत होतो. या दोघांना निरजचे वडील आणि ग्वाल्हेरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने मदत केली. १५ वर्षे सोबत राहूनही ग्वाल्हेरच्या महिलेशी त्याचा संपर्क होता. या चौघांनी मिळून आपली फसवणूक केली आहे, असे नमूद केले आहे.
आमच्या वडिलांनी जमिनीसाठी आश्रमाशी संबंधित व्यक्तींना ७ लाख रुपये दिले होते. १८ लाख रुपये गरीब मातांकडून घेतले होते, जे या चौघांनी हडप केले आहेत. इतकेच नाही तर महिलांशीही गैरवर्तवणूक करत होते आणि आपलं कोणी काही बिघडवू शकत नाही, असा रुबाबही दाखवत होते, असं दोन्ही बहिणींनी म्हटलं आहे.
तसंच चिठ्ठी मुन्नी आणि मृत्युंजय यांच्याकडे पाठवली असल्याचंही म्हटलं आहे. काही बहिणी या प्रकारांमधूनच आत्महत्या करतात. आमची फसवणूक करण्यात आली आहे. नीरज सिंघल माऊंट अबू येथील कंपनीत नोकरी करतो. पूनम, तिचे वडील ताराचंद आणि त्यांच्या बहिणीचा सासरा गुड्डन जयपूरमध्ये राहतो. मात्र आमच्यासोबत १५ वर्षे राहिल्यानंतरही खोटं बोलत आहेत आमची काही चूकी नाही. सर्व खर्च आम्ही केला आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.
आमच्यासोबत कोणी नाही. आम्ही एकट्या पडल्यामुळे आत्महत्येचं पाऊल उचललं. आमचे भाऊ सोनवीर आणि एन. सिंह यांनी आपली केस न्यायालयात लढवावी, तुम्ही आमच्यासाठी सख्ख्या भावापेक्षा जवळचे आहात. कितीही खर्च येऊ देत या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. आम्हाला हीच राखीची भेट असेल. सर्व पुरावे आश्रमात ठेवले आहेत. त्यांच्याकडे आमचे २५ लाख रुपये आहेत. वडिलांनी ७ लाखांचा प्लॉट खरेदी केला होता. तो विकून दिले आहेत, अशी भावनिक साद त्यांनी घातली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.