उत्तर प्रदेशातील प्रतापगडमध्ये गुरुवारी पहाटे अतिशय दुर्दैवी घटना घडलीये. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नगर कोतवाली परिसरातील महुली भागात असलेलं सुमारे १०० वर्षे जुनं आणि जीर्ण झालेलं घर अचानक कोसळलं. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घरातील एका खोलीत कुटुंबातील सर्व सदस्य झोपले होते. त्या खोलीत एसी असल्यामुळे सर्वांनी तिथेच झोपण्याचा निर्णय घेतला होता. पहाटेच्या सुमारास अचानक घराचा मोठा भाग कोसळला आणि खोलीतील सर्वजण ढिगाऱ्याखाली अडकले.
या भीषण दुर्घटनेत आई-वडील, त्यांचा मुलगा, सून आणि दोन लहान मुलांचा मृत्यू झाला. तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि मोठा पोलीस बंदोबस्त तातडीने घटनास्थळी दाखल झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आलं. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सहा जणांचा जीव वाचवता आला नाही.
प्राथमिक तपासात हे घर सुमारे १०० वर्षे जुनं असून ते खूपच जीर्ण झाल्याचं समोर आलं आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे घराच्या भिंती आणखी कमकुवत झाल्या आणि अखेर संपूर्ण घर कोसळल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले असून या दुर्घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.