बँकॉकमधील एका पबमध्ये भीषण आग
पबमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली
या आगीमध्ये होरपळून २७ जणांचा मृत्यू
या आगीत ६३ जण गंभीर जखमी झालेत
या आगीचा थरारक व्हिडीओ समोर आला
थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भयंकर घटना घडली. याठिकाणी एका पबमध्ये मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत २७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या आगीमध्ये ६३ जण गंभीर जखमी झालेत. या सर्वांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आगीत जखमी झालेल्या ६३ जणांपैकी २२ जणांची प्रकृती गंभीर आहे. या अग्नितांडवाचा थरारक व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकॉक शहराच्या उत्तर भागातील एका पबमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास ही आग लागली. क्षणात ही आग वाढत गेली आणि संपूर्ण इमारतीला आगीने वेढा घातला. आग लागताच सर्वजण घाबरून जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. पण आग जास्त भीषण असल्यामुळे अनेकांना पबमधून बाहेर पडता आले नाही. क्षणात आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण बिल्डिंगला वेढा घातला. त्यामुळे घटनास्थळी भीतीचे वातावरण होते.
थायलंडचे पंतप्रधान अनुतिन चर्नविराकुल यांनी या घटनेनंतर घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. त्यांनी सांगितले की, 'आतापर्यंत २७ जणांचा या आगीमध्ये मृत्यू झाला. अनेक जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीच्या कारणाचा तपास सुरू आहे.' प्रत्यक्षदर्शी आणि बचाव पथकातील कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मध्यरात्रीच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती मिळाली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये पबच्या मुख्य प्रवेशद्वारातून आगीच्या ज्वाला बाहेर पडताना दिसत होत्या तर आत असलेले नागरिक जीव वाचवण्यासाठी धावताना दिसत होते.
fireस्थानिकांनी सांगितले की, चाटुचक जिल्ह्यातील 'राँग बीअर ना लाट फ्राओ' या पबला ही आग लागली. बचाव पथकाने सुरुवातीला जखमी झालेल्या एका व्यक्तीला बाहेर काढले पण नंतर त्यांच्या लक्षात आले की अनेक जण पबमध्ये अडकले आहेत. एक एक करत २७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. आगीपासून वाचण्यासाठी अनेक जण पबच्या टॉयलेटमध्ये लपले होते. त्यामुळे त्याठिकाणापर्यंत आग पोहचली आणि त्यांना बाहेर पडता आले नाही आणि त्याच ठिकाणी अनेकांचा होरपळून मृत्यू झाला. एकाच ठिकाणावरून अनेक मृतदेह बाहेर काढण्यात आले.
पोलिस सध्या आगीच्या कारणाचा तपास करत आहेत. आग इतक्या वेगाने कशी पसरली आणि पबमध्ये आगीपासून सुरक्षेची पुरेशी व्यवस्था होती की नाही याचा देखील तपास केला जात आहे. या घटनेमुळे थायलंडमधील पब, हॉटेलमधील अग्निसुरक्षेबद्दल पुन्हा प्रश्न निर्माण झाले आहेत. २०२२ मध्ये, पूर्व थायलंडमधील एका म्युझिक पबमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला होता. देशातील सर्वात भीषण नाईटक्लब दुर्घटना २००९ मध्ये बँकॉक येथील संतिका नाईटक्लबमध्ये घडली होती. या आगीच्या घटनेमध्ये ६६ जणांचा मृत्यू झाला आणि २०० हून अधिक लोक जखमी झाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.