भोपाळ: मध्य प्रदेशातील नरसिंहपूर येथे रविवारी शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर उत्तराधिकारी घोषित करण्यात आले आहेत. स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांच्या दोन शिष्यांना दोन वेगवेगळ्या मठांची जबाबदारी देण्यात आली आहे.
स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना ज्योतिष पीठ बद्रीनाथ आणि स्वामी सदानंद यांना द्वारका शारदा पीठाचे प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबतची घोषणा स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांच्या पार्थिवासमोरच त्यांचे स्वीय सचिव सुबोद्धानंद महाराज यांनी केली. आतापासून स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि स्वामी सदानंद हे या दोन्ही पीठांचा कार्यभार सांभाळतील, असे त्यांनी घोषणा करताना सांगितले.
द्वारका पीठाचे जगतगुरू शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांचे रविवारी मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) नरसिंहपूर जिल्ह्यातील त्यांचे आश्रम झोतेश्वर येथे निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते. धार्मिक आणि राजकीय मुद्द्यांवर ते सडेतोड भाष्य करत होते.
स्वामी स्वरुपानंद सरस्वती हे गुजरात (Gujarat) स्थित द्वारका-शारदा पीठ आणि उत्तराखंड स्थित ज्योतिष पीठ बद्रीनाथचे शंकराचार्य होते. मागील एका वर्षापासून ते आजारी होते. ते डायलिसिसवर होते आणि गेल्या काही महिन्यांपासून आश्रमात त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात येत होते. त्यांच्यावरील उपचारांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. याशिवाय ते मधुमेहाने ग्रस्त होते.
सिवनी जिल्ह्यात झाला होता जन्म
स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांचे शिष्य दंडी स्वामी सदानंद यांनी सांगितले की, ज्योतिष आणि शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांचा जन्म मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील दिघोरी गावात झाला होता. त्यांचे बालपणीचे नाव पोथीराम उपाध्याय होते. स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी अवघ्या नवव्या वर्षी घर सोडले आणि त्यांनी धार्मिक यात्रांना जाण्यास सुरुवात केली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.