स्पेनमध्ये वाढत्या महागाईच्या विरोधात नागरिकांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण आले आहे. वाढत्या घरांच्या किमती आणि घर भाडे वाढल्यामुळे स्पेनमध्ये आंदोलन सुरू आहे. पगारवाढ आणि भाडेकपातीच्या मागणीसाठी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. आपला आवाज सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी लाखो कामगारांनी हिंसेचा मार्ग अवलंबला आहे. स्पेन देशभरातील अनेक शहरांमध्ये आंदोलने सुरू आहे. आंदोलनादरम्यान जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. आंदोलक आणि पोलिस आमनेसामने आल्यामुळे परिस्थिती चिघळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ११ नोव्हेंबरला झालेल्या संपामुळे स्पेनमधील जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक शहरांमधील कारखाने बंद पडले आहेत. बंदरे ठप्प झाली आहेत. हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. स्पेनमधील दोन प्रमुख कामगार संघटना UGT आणि CCOO यांनी हा संप पुकारला असून जवळपास ४० लाख कामगार या संपात सहभागी झाल्याचा दावा करण्यात आला. २०१२ नंतरचा हा सर्वा मोठा सार्वत्रिक संप होता.
स्पेनची राजधानी माद्रिदमधील प्रसिद्ध ग्रान व्हिया रस्त्यावर आंदोलकांचा संताप पाहायला मिळाला. रस्त्यावर मोठ्या संख्येने आंदोलक उतरले होते. हातात घरांच्या चाव्या घेऊन नागरिकांनी सरकार आणि मोठ्या उद्योगसमूहांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनांमुळे प्रिमार्क, एच अँड एम आणि पुल अँड बेअर यासारखी अनेक दुकाने बंद राहिली. सामान्य नागरिक आपले घरभाडेसुद्धा देऊ शकत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येवर सरकारने तोडगा काढावा अशी मागणी केली जात आहे.
या आंदोलनामध्ये मोठ्यासंख्येने तरुणांनी देखील सहभाग घेतला होता. या तरुणांनी सांगितले की, वाढते घर भाडे आणि घरांच्या वाढत्या किंमतींमुळे त्यांना आपले आयुष्य सुरू करण्यासाठी कुटुंबापासून दूर राहाणे शक्य होत नाही.' या आंदोलनादरम्यान नागरिक चांगलेच संतप्त झाले. खराब हवामान आणि सोसाट्याच्या वाऱ्याची पर्वा न करता ते आंदोलन करतच राहिले. घर ही चैनीची वस्तू नसून प्रत्येक व्यक्तीची मुलभूत गरज आहे असे आंदोलकांचे मत आहे.
या आंदोलनादरम्यान नागरिकांनी जाळपोळ केल्याचा प्रकार देखील घडला. मुख्य रॅली संपल्यानंतर आंदोलकांनी रस्त्यावर फर्निचर आणि कचराकुंड्यांना आग लावली. काही ठिकाणी रास्तारोको करण्यात आला. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये वाद झाला. पोलिसांनी यावेळी आंदोलकांवर लाठीचार्ज देखील केला. नुकसान होऊ नये या भीतीने अनेक दुकान चालकांनी दुकानं बंद ठेवली होती. या आंदोलनादरम्यान देशभरात ७३ पेक्षा अधिक नागरिकांना अटक करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.