राजस्थानमधील सरपंचपदाच्या निवडणुकीत ओम प्रकाश बिश्नोई यांना केवळ ३३ मतं
ऑनलाइन मोठा प्रेक्षकवर्ग असूनही निवडणुकीत अपेक्षित प्रतिसाद नाही
बिश्नोई यांनी प्रचारात नशामुक्तीचा मुद्दा मांडला
मोबाईल आणि मोबाईल बाहेरचं जग अगदीच वेगळं आहे. उदाहरणार्थ जी माणसं तुम्हाला सोशल मीडियावर फॉलो करतात त्यांच्यासाठी तुम्ही महत्त्वाचे असालच असे नाही. याची प्रचिती राजस्थानच्या निवडणुकीत आली. सोशल मीडियावर लाखोने फॅन्स असलेल्या ओम प्रकाश बिश्नोई यांना सरपंचपदाच्या निवडणुकीत अवघी ३३ मतं मिळाल्याने या निकालाची चर्चा रंगली आहे.
ओम प्रकाश बिश्नोईंनी राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील ओसिया तालुक्यातील इंदो गटातील ढाणी ग्रामपंचायतीतून सरपंचपदासाठी निवडणूक लढवली होती. सोशल मीडियावरील त्यांचे फॉलोवर्स पाहता या निवडणुकीत त्यांना किती मतं मिळणार, याकडे लक्ष लागलं होतं. मात्र, प्रत्यक्ष मतदानात त्यांना फक्त ३३ मतांवर समाधान मानावं लागलं.
बिश्नोईंची सोशल मीडियावरची लोकप्रियता मोठी आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे सुमारे १४ लाख फॉलोअर्स आहेत, तर फेसबुकवर २.३२ लाख लोक त्यांना फॉलो करतात. याशिवाय, त्यांच्या यूट्यूब चॅनेलचे पाच लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स असल्याची माहिती आहे. विविध प्लॅटफॉर्मवर एवढा मोठा प्रेक्षकवर्ग असूनही निवडणुकीत मिळालेल्या कमी मतांमुळे ऑनलाइन लोकप्रियता आणि प्रत्यक्ष जनसमर्थन यातील फरक अधोरेखित झाला आहे.
निवडणुकीच्या प्रचारात बिश्नोईंनी नशामुक्तीचा मुद्दा मांडला होता. मात्र, या मुद्द्याला मतदानाच्या रूपात किती पाठिंबा मिळाला, याचं चित्र निकालातून स्पष्ट झालं. ग्रामपंचायत निवडणुकीत गावातील मूलभूत सुविधा, स्थानिक समस्या, नागरिकांशी असलेला संपर्क आणि उमेदवाराविषयीचा विश्वास अशा अनेक बाबी महत्त्वाच्या ठरू शकतात. सोशल मीडियावर व्हिडिओंना मिळणारे व्ह्यूज, लाईक्स आणि कमेंट्स हे एखाद्या व्यक्तीची लोकप्रियता दर्शवतात. मात्र, हेच लोक मतदानाच्या वेळी त्या व्यक्तीला पसंती देतील, याची खात्री नसते. ऑनलाइन प्रेक्षकवर्ग आणि प्रत्यक्ष मतदार यांच्यात फरक असू शकतो, हे या घटनेतून दिसून येतं. दरम्यान, राजस्थानमध्ये पंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १६ जिल्ह्यांतील ३३१४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडल्याची माहिती आहे. या निवडणुकांमध्ये सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची निवड करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.