नवी दिल्ली : सोशल मीडियावर महिलेचा फोटो शेअर करत तिच्याबद्दल अपशब्द लिहून बदनामी करणाऱ्या एकाला दिल्ली पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. या महिलेचा आरोपीकडून दोन वर्षे अशा प्रकारे छळ सुरू होता. आरोपीनं तिचा मोबाइल क्रमांक एका भिंतीवर लिहला होता. तसंच सोशल मीडियावर फोटो टाकून त्याखाली बदनामीकारक मजकूर पोस्ट केला होता. आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ३८ वर्षांची असून, ती उत्तर दिल्लीतील सब्जी मंडी परिसरात राहते. एका व्यक्तीकडून सोशल मीडियावर आपली बदनामी केली जात असल्याची तक्रार तिने केली होती. यासीन शेख असे आरोपीचं नाव आहे. तो पुण्यात रिक्षा चालवतो.
आरोपीनं सार्वजनिक ठिकाणी भिंतींवर पीडितेचा फोन नंबर लिहले होते. तसंच तिचे फोटो आणि आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर पोस्ट केले होते. एवढ्यावरच न थांबता आरोपी दररोज स्वतःची सोशल मीडियावर नवीन प्रोफाइल तयार करून महिलेसंदर्भात आक्षेपार्ह व्हिडिओ आणि तिचा नंबर अपलोड करत असे आणि त्या पोस्टवर अपमानास्पद कमेंट करत होता. या प्रकारामुळे महिलेला दररोज अज्ञात नंबरवरून अनेक फोन येत होते.
या प्रकरणी उत्तर सायबर पोलीस ठाण्यात आरोपी यासीन शेख विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 78 (पाठलाग करणे), 79 (महिलेचा विनयभंग), 351 (धमकी देणे) आणि 356 (बदनामी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष पोलीस पथक नेमले. दिल्ली पोलिस दलातील उत्तर विभागाचे डीसीपी (उत्तर) राजा बांठिया म्हणाले की, महिलेने दाखल केलेल्या तक्रारीवरून तपास सुरू केला. आरोपीला पुण्यातून अटक केली. संशयित आरोपी हा पीडित महिलेला मागील २-३ वर्षांपासून त्रास देत असल्याचे तपासातून समोर आले.
आरोपीनं सुरुवातीला पोलिसांना माहिती देण्यास टाळाटाळ केली. शेवटी पोलिसांनी खाक्या दाखवला. त्याची एक मैत्रिण तक्रारदार महिलेच्या पतीसोबत काम करायची, जे त्याला आवडत नसे. याबद्दल आरोपी शेखने त्याच्या मैत्रिणीला काम न करण्यास सांगितले. परंतु तिने त्याचे ऐकले नाही. यामुळे चिडलेल्या शेखने तक्रारदार महिलेच्या पतीशी संपर्क साधून त्याच्या मैत्रिणीपासून दूर राहण्यास सांगितले. जेव्हा हा प्रयत्न अयशस्वी झाला तेव्हा आरोपीने त्या दाम्पत्याचा संपर्क क्रमांक मिळवून दोघांनाही कॉलद्वारे धमकी आणि शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही, तर आरोपीने तक्रारदार महिलेची सोशल मिडियावर बदनामी करण्यास सुरुवात केली.
डीसीपी बांठिया यांनी पुढे सांगितले की, पोलिसांनी आरोपीच्या कथित प्रेयसीशीही संपर्क साधला असता, तिने शेखसोबत प्रेमसंबंध नसल्याचे सांगितले. उलट आरोपी शेख विनाकारण तिच्या मागे लागल्याचे तिने सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.