राजस्थानमध्ये जैसलमेरहून जोधपूरला जाणारी प्रवासी बसला लागली अचानक आग
बसमध्ये ५७ प्रवासी होते
दुर्घटनेत १० ते १२ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
आगीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही, प्राथमिक तपास सुरू
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा घटनास्थळी भेट देण्याची शक्यता
राजस्थानमध्ये मंगळवारी मोठी दुर्घटना घडली आहे. जैसलमरहून जोधपूरला जाणाऱ्या बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. बसमध्ये ५७ प्रवासी बसल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत १० ते १२ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बसला नेमकी कशी आग लागली, याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेनंतर मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे तातडीने जैसलमेर घटनास्थळी जाण्याची शक्यता आहे. तर मुख्यमंत्री जखमींची देखील भेट घेण्याची शक्यता आहे.
राजस्थानमधील या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी दु:ख व्यक्त केलं. माहिती मिळताच मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी कलेक्टर-एसपी यांना फोन करून जखमींना तातडीने मदत करण्याचे आदेश दिले. या घटनेविषयी वेळोवेळी अपडेट घेत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
जैसलमेरमध्ये आर्मी स्टेशनजवळ ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या १६ लोकांना तातडीने जोधपूरमधील रुग्णालयात नेण्यात येत आहे. ही एक खासगी बस होती. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन तातडीने मदतीसाठी सक्रिय झालं. प्रशासनाने तातडीने बचाव कार्य सुरु केलं. जिल्हा अधिकारी प्रताप सिंह यांनी घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
आग नेमकी कशी लागली, याचा तपास करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. आग लागल्यानंतर प्रशासनाने हेल्पलाइन नंबर देखील जारी करण्यात आले आहेत. 9414801400, 8003101400, 02992-252201 आणि 02992-255055 हे फोन क्रमांक मदतीसाठी जारी करण्यात आले आहेत.
बस दुर्घटनेत राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ काँग्रेस नेते अशोक गहलोत यांनीही दु:ख व्यक्त केलं. त्यांनी म्हटलं की, 'बसला लागलेल्या आगीत अनेक जण जखमी झाल्याची घटना दुर्दैवी आहे. मी ईश्वराला प्रार्थना करतो की, दुर्घटनेतील जखमी लवकर बरे होऊदेत'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.