Self Medication saam tv
देश विदेश

Self Medication: भारतात 61 टक्क्यांहून अधिक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतात औषधं; तरुणांमध्ये प्रमाण सर्वाधिक, रिसर्चमधून धक्कादायक माहिती समोर

Self Medication in India: भारतात 61.1 टक्के लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेत असल्याचं संशोधनातून समोर आलंय. स्वतःच्या मनाने औषधं घेतल्याने अँटिबायोटिक रेझिस्टन्स, लिव्हर आणि किडनीचं नुकसान होण्याचा धोका कसा वाढतो, हे जाणून घेऊयात.

Surabhi Jayashree Jagdish

डोकेदुखी, थोडा ताप किंवा सर्दी-खोकला झाला की अनेकजण डॉक्टरांकडे जाण्याऐवजी थेट मेडिकलमधून औषधं घेतात. सुरुवातीला ही गोष्ट साधी वाटत असली तरी आता ही सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरतेय. भारतातील जवळपास 61.1 टक्के लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वतःच औषधं घेत असल्याची माहिती एका संशोधनातून समोर आलीये. आंतरराष्ट्रीय रिसर्च जनरल'बीएमसी पब्लिक हेल्थ'मध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालंय.

या संशोधनानुसार, स्वतःच्या मनाने औषधं घेण्याचं प्रमाण तरुण आणि विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक आहे. या गटातील तब्बल 74 टक्के लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेतात. राज्यांचा विचार केला तर मध्य प्रदेशमध्येही परिस्थिती चिंताजनक आहे. तिथे 68 टक्के लोक स्वतःच औषधं घेऊन उपचार करत असल्याचं समोर आलं आहे.

कोणत्या संस्थांनी केलं संशोधन?

हे संशोधन डॉ. हरीसिंह गौर केंद्रीय विद्यापीठ, सागरमधील मानवशास्त्र विभागाचे प्राध्यापक राजेश गौतम, अमेरिकेतील मोंटक्लेअर स्टेट युनिव्हर्सिटीचे यमबी लिम्बू आणि टार्लटन स्टेट युनिव्हर्सिटीचे सुबी गांधी यांनी मिळून केलंय.

या संशोधकांच्या टीमने पबमेड, स्कोपस आणि वेब ऑफ सायन्स या जगभरातील महत्त्वाच्या वैज्ञानिक माहितीच्या स्रोतांचा अभ्यास केला. देशातील 23 राज्यं आणि 76 हून अधिक शहरांमध्ये झालेल्या 145 संशोधनांचा आढावा घेण्यात आला. या संपूर्ण अभ्यासात 69 हजार 876 नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित माहिती आणि औषधं घेण्याच्या सवयींचा अभ्यास करण्यात आला.

कोरोनानंतर प्रमाण वाढलं

कोरोना महामारीनंतर लोकांच्या औषधं घेण्याच्या सवयींमध्ये मोठा बदल झाल्याचं या संशोधनातून दिसून आलं आहे. महामारीच्या आधी भारतात स्वतःच्या मनाने औषधं घेण्याचं प्रमाण 57 टक्के होतं. कोरोना काळात हे प्रमाण वाढून 61 टक्क्यांवर पोहोचलं. तर कोरोना महामारी संपल्यानंतरच्या काळात हे प्रमाण आणखी वाढून 63 टक्के झालं आहे.

यामागे काही महत्त्वाची कारणं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कोरोना काळात रुग्णालयात गेल्यास संसर्ग होण्याची भीती अनेकांना वाटत होती. याशिवाय डॉक्टरांची वेळ मिळण्यासाठी लागणारा वेळ आणि सुरुवातीला दिसणारी लक्षणं साधी आहेत असा अनेकांचा समज यामुळे लोक मेडिकलमधून थेट औषधं घेऊ लागले.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं का ठरू शकतं धोकादायक?

डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधं घेणं शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं, असा इशारा संशोधक आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

अँटिबायोटिक औषधांचा परिणाम कमी होणं

सर्दी, ताप किंवा इतर त्रास झाल्यावर अनेकजण स्वतःच अँटिबायोटिक औषधं घेतात. पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशी औषधं वारंवार घेतल्यास शरीरातील जिवाणूंवर या औषधांचा परिणाम होणं कमी होऊ शकतं. याला अँटिबायोटिक रेझिस्टन्स म्हणतात. त्यामुळे भविष्यात गंभीर संसर्ग झाल्यास औषधं घेतल्यानंतरही त्यांचा उपयोग होणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

गंभीर आजारांची लक्षणं लक्षात येत नाहीत

अनेकजण डोकेदुखी किंवा अंगदुखी झाल्यावर लगेच पेनकिलर घेतात. त्यामुळे काही वेळासाठी वेदना कमी होतात. पण शरीरात अल्सर, ट्यूमर किंवा हृदयाशी संबंधित आजार वाढत असतील, तर त्यांची लक्षणं वेळेवर लक्षात येत नाहीत. परिणामी योग्य वेळी उपचार मिळण्यास उशीर होऊ शकतो.

लिव्हर आणि किडनीला नुकसान होण्याचा धोका

कोणतं औषध किती प्रमाणात घ्यायचं, हे प्रत्येकाच्या आरोग्यानुसार ठरतं. चुकीच्या प्रमाणात औषधं घेतल्यास किंवा दोन औषधांमुळे शरीरात चुकीची प्रतिक्रिया झाल्यास लिव्हर, किडनी आणि आतड्यांना कायमचं नुकसान होण्याचा धोका असतो.

या संशोधनात ड्रग कंट्रोलर आणि धोरण ठरवणाऱ्या यंत्रणांना काही महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मेडिकल स्टोअर्समध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणाऱ्या औषधांच्या विक्रीवर अधिक कडक नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे. यासोबतच टेलिमेडिसिन म्हणजेच फोन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून डॉक्टरांचा सल्ला घेण्याची सुविधा अधिक वाढवण्याची शिफारसही करण्यात आलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shengdana Chutney Recipe : हिवाळ्यात गरमागरम भाकरीसोबत हवीच शेंगदाण्याची चमचमीत चटणी, वाचा अस्सल पारंपरिक रेसिपी

Maharashtra News Live Update: मुंबई महापालिकेच्या ३७ कोटींच्या डिजिटल क्लासरूम प्रकल्पाची चौकशी होणार

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! प्रवाशांनी खचाखच भरलेली बस ट्रकला धडकली, १३ जणांचा मृत्यू

दोन चिमुकल्यांचं छत्र हरपलं! शिवाई बसची दुचाकीला धडक, आई-वडिलांचा जागीच मृत्यू

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांची मोठी खेळी, भाजप अन् शिंदेसेनेला झटका; १०० पदाधिकाऱ्यांनी हाती घेतलं घड्याळ

SCROLL FOR NEXT