Knee Swelling in Children: मुलांच्या गुडघ्याला सतत सूज येतेय? दुर्लक्ष करू नका, असू शकतो हा गंभीर आजार!

Juvenile Arthritis: लहान मुलांमध्ये होणारा जुवेनाईल इडिओपॅथिक आर्थरायटिस हा गंभीर आजार ठरू शकतो. सांध्यांना सतत सूज येणे, सकाळी आखडणे, लंगडणे ही लक्षणं ओळखा. उशिरा निदान झाल्यास हाडांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. वेळेवर उपचार आणि नियमित डोळ्यांची तपासणी का महत्त्वाची आहे हे जाणून घ्या.
Knee Swelling in Children
Knee Swelling in Childrensaam tv
Published On: 

लहान मुलांच्या गुडघ्याला किंवा इतर सांध्यांना सूज आली आणि ती सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ कमी झाली नाही, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण हे जुवेनाईल आर्थरायटिस (Juvenile Arthritis) या आजाराचं लक्षण असू शकते. वेळेवर उपचार न मिळाल्यास मुलांच्या हाडांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो.

मुंबईमध्ये तीन वर्षांची एक मुलगी घरात घसरून पडली. त्यामुळे तिच्या डाव्या गुडघ्याला सूज आली. सुरुवातीला पालकांना ही किरकोळ दुखापत वाटली. पण अनेक दिवस उलटूनही सूज कमी झाली नाही. रात्रीच्या वेळी तिच्या वेदना वाढू लागल्या. त्यानंतर महिन्याभराने तिच्या दुसऱ्या घोट्यालाही दुखू लागले.

पुढील वर्षभरात मुलीला अनेक डॉक्टरांकडे दाखवण्यात आलं. तिची एमआरआय (MRI) तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे टीबीच्या चाचण्याही करण्यात आल्या. प्रत्येक तपासणीत सूज दिसून आली. परंतु यावेळी मात्र दुखापत झाल्याचं कोणतंही चिन्ह आढळलं नाही. हळूहळू तिच्या गुडघ्याचे स्नायू कमकुवत होऊ लागले. त्यामुळे तिला पायाचा वापर करणंही कठीण झालंय.

Knee Swelling in Children
Winter Foot Itching: थंडीच्या दिवसांत पायांच्या बोटांना खाज सुटतेय? लगेच करा हे 5 घरगुती उपाय, मिळेल आराम

लक्षणं सुरू झाल्यानंतर तब्बल १४ महिन्यांनी एका बालरोग संधिवात तज्ज्ञांनी तिला जुवेनाईल इडिओपॅथिक आर्थरायटिस असल्याचं निदान केलं. हा मुलांमध्ये होणारा संधिवाताचा एक प्रकार आहे. वयाच्या १६ वर्षांपूर्वी या आजाराची सुरुवात होऊ शकते आणि तो किमान सहा आठवडे राहू शकतो. या मुलीला या आजाराचा सर्वात सामान्य प्रकार होता. यामध्ये चार किंवा त्यापेक्षा कमी सांध्यांवर परिणाम होतो. हा आजार नेमका कशामुळे होतो, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मुंबईतील नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलमधील बालरोग संधिवातशास्त्र सल्लागार डॉ. अर्चना खान यांनी सांगितले की, उशिरा निदान झाल्यामुळे या मुलीच्या हाडांच्या वाढीवर परिणाम झाला. सांध्यांमध्ये दीर्घकाळ सूज राहिल्यास हाडांची वाढ प्रभावित होऊ शकते. त्यामुळे हात किंवा पायांच्या लांबीमध्ये फरक पडू शकतो.

मुलांमध्ये कोणती लक्षणं दिसतात?

सांध्यांची सूज कमी न होणं, सकाळी उठल्यानंतर सांधे आखडणं, कोणतीही दुखापत नसताना मूल लंगडणं आणि हात किंवा पायांचा वापर न करणं वापरण्यास नकार देणं ही या आजाराची लक्षणं असू शकतात. ही लक्षणं सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

सांध्यांचा टीबी, सांध्यांना झालेला संसर्ग, ऱ्हुमॅटिक फिव्हर किंवा हिमोफिलिया या आजारांमध्येही अशीच लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे उपचार सुरू करण्यापूर्वी योग्य निदान होणं गरजेचं आहे. एखादा सांधा अचानक गरम झाला, सुजला किंवा मुलाला जास्त ताप आला, तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Knee Swelling in Children
Burning Sensation While Urinating: लघवी करताना जळजळ होतेय, गंभीर आजाराचे संकेत असू शकतात का? वाचा

डोळ्यांची तपासणीही महत्त्वाची

डॉ. अर्चना खान यांनी सांगितलं की, जुवेनाईल आर्थरायटिसमध्ये डोळ्यांची तपासणी करणंही महत्त्वाचं आहे. या आजारामुळे क्रॉनिक अँटेरिअर युवेइटिस हा डोळ्यांचा आजार होऊ शकतो. यामध्ये डोळ्यांना वेदना होत नाहीत किंवा डोळे लालही होत नाहीत. मात्र मुलांची दृष्टी कमी होऊ शकते. त्यामुळे दर तीन महिन्यांनी डोळ्यांची तपासणी करणं आवश्यक आहे.

उपचारांमुळे मुलगी पुन्हा धावू लागली

या मुलीवर सूज कमी करणारी औषधं, गुडघ्यात स्टेरॉइडचं इंजेक्शन आणि दर आठवड्याला मेथोट्रेक्सेट देऊन उपचार करण्यात आलं. औषधांमुळे उलट्या होत असल्यास इंजेक्शनद्वारे औषध दिलं जात होतं. औषधाचा एक डोस चुकला तरी मुलीच्या सांध्यांची सूज पुन्हा वाढत होती. पण कुटुंबाने नियमित उपचार सुरू ठेवले. त्यामुळे आजार नियंत्रणात आला आणि नंतर औषधंही बंद करण्यात आली. आता ही मुलगी पुन्हा धावू आणि खेळू शकते.

Knee Swelling in Children
Cholesterol Detox Tips: रक्तातील चरबी मेणासारखी वितळवेल आल्याचं पाणी? कसं बनवाल हे पाणी, आताच नोट करा

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.