

सांधेदुखी ज्याला वैद्यकीय भाषेत 'आर्थ्राल्जिया' असंही म्हणतात. हे रुग्ण अस्थिरोग तज्ज्ञांकडे जाण्याचं एक सर्वात मोठं कारण आहे. याचा त्रास तरुण खेळाडूंपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत कोणालाही होऊ शकतो. आपल्या शरीरात ज्या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा जास्त हाडे एकत्र येतात त्याला 'सांधा' म्हणतात. या सांध्याला कूर्चामुळे गादीसारखं संरक्षण मिळतं सायनोविअल द्रवामुळे हालचालीसाठी वंगण मिळतं. आणि अस्थिबंध, कंडरा तसंच स्नायूंमुळे त्याला स्थिरता आणि मजबुती मिळते. जेव्हा यापैकी कोणत्याही भागाला इजा होते, सूज येते किंवा त्यांची झीज होते, तेव्हा सांधेदुखी सुरू होते.
नवी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील ऑर्थोपेडिक कंसल्टंट डॉ सुभाष धिवरे यांनी सांगितलं की, ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये ऑस्टियोआर्थरायटिस होण्याचा धोका जास्त असतो. हा असा आजार आहे ज्यामध्ये सांध्यांना गादीसारखे संरक्षण देणारी कूर्चा हळूहळू झिजत जाते. ज्यामुळे हाडं एकमेकांवर घासली जातात. या आजाराच्या लक्षणांमध्ये शारीरिक हालचाल केल्यावर सांधेदुखी वाढणं, सकाळी उठल्यावर सांधे जखडणंआणि हालचाल करताना सांध्यांमधून कट-कट असा आवाज येणं किंवा घासल्यासारखे जाणवणं यांचा समावेश होतो.
याचा त्रास प्रामुख्याने गुडघे, नितंब, पाठीचा कणा आणि हात या सांध्यांमध्ये होतो. लठ्ठपणा, भूतकाळात झालेली दुखापत, वाढते वय आणि अनुवांशिकता ही हा आजार होण्याची मुख्य कारणे आहेत.
रूमेटॉइड आर्थरायटिसमध्ये रोगप्रतिकारशक्ती चुकून सांध्यांच्या आतील अस्तरावर हल्ला करते. या आजारामुळे प्रामुख्याने हात आणि पायांच्या लहान सांध्यांमध्ये दोन्ही बाजूंना सारखीच सूज येते. याशिवाय सकाळी उठल्यावर सांधे खूप वेळ जखडून राहणं, सांध्यांच्या ठिकाणी उष्णता जाणवणं, प्रचंड थकवा आणि काहीवेळा ताप येणं ही याची लक्षणं आहेत.
अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस, सोरियाटिक आर्थरायटिस आणि ल्युपस हे आजार देखील सांधेदुखी आणि सांध्यांना सूज येण्याचे कारण ठरू शकतात. या आजारांचं लवकरात लवकर निदान होणं अत्यंत आवश्यक आहे. कारण उपचाराला उशीर झाल्यास सांधे कायमचे खराब होऊ शकतात आणि त्यांचा आकार बदलू शकतो.
हाडांचे फ्रॅक्चर, लिगामेंट फाटणं जसं की, अँटीरियर क्रुशिएट लिगामेंट दुखापत, मेनिस्कल टेअर्स, सांधा निखळणं आणि लचक भरणं ही खेळताना होणाऱ्या दुखापती किंवा रस्ते अपघातांमुळे सांधेदुखी सुरू होण्याची सामान्य कारणे आहेत. सुरुवातीला किरकोळ वाटणारी एखाद्या दुखापतीवर योग्य उपचार केले गेले नाहीत तर भविष्यात वयाच्या आधीच ऑस्टियोआर्थरायटिस होण्यास कारणीभूत ठरू शकते.
एखाद्या सांध्यावर किंवा त्याच्या सभोवतालच्या उतींवर सतत आणि वारंवार पडणाऱ्या ताणामुळे टेंडिनायटिस, बर्सायटिस, टेनिस एल्बो आणि रनर्सनी यांसारखे आजार उद्भवू शकतात. ज्या कामांमध्ये वारंवार वजन उचलावं लागतं, उठबस करावं लागतं किंवा हाताची एकसारखीच हालचाल वारंवार करावी लागते अशा कामांमुळे हे आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो.
रक्तामध्ये युरिक ॲसिडचं प्रमाण जास्त झाल्यास सांध्यांमध्ये युरेट क्रिस्टल्स तयार होऊ लागतात आणि यामुळे 'गाऊट' हा आजार होतो. हे क्रिस्टल्स सांध्यांमध्ये अचानक आणि तीव्र वेदना, सूज, लालसरपणा आणि स्पर्श न सहन होणं यांसारख्या त्रासाला कारणीभूत ठरतात. याचा फटका प्रामुख्याने पायाच्या अंगठ्याच्या मुळाशी असलेल्या सांध्याला बसतो.
सांध्यांमध्ये होणारा संसर्ग म्हणजेच 'सेप्टिक आर्थरायटिस' ही एक ऑर्थोपेडिक इमर्जन्सी आहे. यामध्ये तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज असते. सांधा अतिशय गरम होणं, त्याला सूज येणं आणि तीव्र वेदना होणं या लक्षणांसोबत ताप देखील येतो. तातडीने उपचार न केल्यास आणि संसर्गावर वेळेत नियंत्रण न मिळवल्यास, अगदी कमी कालावधीत सांध्याचं गंभीर आणि कायमचं नुकसान होऊ शकतं
व्हिटॅमिन डी ची कमतरता, आहारात कॅल्शियमचं अपुरं प्रमाण आणि ऑस्टिओपोरोसिस या गोष्टींमुळे हाडांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे हाडं दुखू शकतात आणि फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. अतिशय सुस्त किंवा बैठी जीवनशैली सांध्यांना आधार देणारे स्नायू कमकुवत होऊ शकतात. याशिवाय शरीराचं अतिरक्त वजन भार पेलणाऱ्या सांध्यांवरचा ताण वाढवते. वाढलेल्या वजनामुळे रोजच्या साध्या हालचाली करताना किंवा दैनंदिन कामे करताना देखील गुडघ्यांवर पडणारा दाब लक्षणीयरीत्या वाढू शकतो.
सांधेदुखीची इतरही काही कारणं असू शकतात. ज्यामध्ये चुकीची शारीरिक स्थिती, सपाट पावलं, अयोग्य चपला, मेनोपॉजनंतर होणारे हार्मोनल बदल, सांध्यांच्या जन्मजात समस्या आणि पाठीच्या कण्यातून सुरू होऊन सांध्यांपर्यंत पोहोचणाऱ्या वेदना यांचा समावेश होतो.
सांधेदुखी दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहिल्यास
सांध्याभोवती सूज, लालसरपणा किंवा गरमपणा जाणवल्यास
शरीराचे वजन पेलण्यास अडचण येत असल्यास किंवा सांध्याची पूर्ण हालचाल करणे कठीण जात असल्यास
सांध्याचा आकार बदलल्यास किंवा सांधा अडकल्यासारखा वाटल्यास
सांधेदुखीसोबत ताप येत असल्यास
रात्रीच्या वेळी तीव्र वेदना होऊन तुमची झोप मोड होत असल्यास
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.