

आपल्या शरीरात किडनीचं काम खूप महत्त्वाचं असतं. किडनी दिवसभर शांतपणे आपलं काम करत असते. शरीरातील घाण आणि हानिकारक पदार्थ बाहेर काढण्याचं काम किडनी करते. त्यामुळे किडनीच्या कामात थोडी जरी अडचण आली तरी त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होऊ शकतो. किडनी खराब होऊ लागल्यास शरीर काही संकेत देतं. हे संकेत वेळीच ओळखणं महत्त्वाचं आहे. कारण या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.
लघवीच्या रंगात किंवा प्रमाणात बदल होणं, पाय आणि घोट्यांना सूज येणं, सतत थकवा जाणवणं, मळमळ आणि अशक्तपणा ही किडनीच्या आजाराची काही सामान्य लक्षणं आहेत. पण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. किडनीचा आजार सुरुवातीच्या टप्प्यात असताना अनेकदा कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे कुटुंबात याआधी कोणाला किडनीचा आजार झाला असेल किंवा तुम्हाला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर वेळोवेळी किडनीची तपासणी करून घेणं आवश्यक आहे.
लघवीमध्ये होणारे बदल हे किडनीच्या त्रासाचे संकेत असू शकतात. नेहमीपेक्षा कमी किंवा जास्त लघवी होणं, रात्री वारंवार लघवीला जावं लागणं, लघवीमध्ये फेस किंवा बुडबुडे दिसणं, लघवीतून रक्त येणं किंवा लघवीचा रंग गडद होणं ही लक्षणं दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.
किडनीचं काम बिघडल्यास ती शरीरातील हानिकारक पदार्थ योग्य प्रकारे बाहेर काढू शकत नाही. त्यामुळे शरीरात जास्तीचं पाणी साचू लागतं. यामुळे पाय, घोटे आणि पोटऱ्यांना सूज येऊ शकते. या प्रकारच्या सुजेला वैद्यकीय भाषेत एडिमा असं म्हणतात.
किडनीच्या आजारात डोळ्यांभोवती सूज येऊ शकते. डोळ्यांना लालसरपणा येणं आणि सूज दिसणं अशी लक्षणंही जाणवू शकतात. ही समस्या अनेकदा उच्च रक्तदाबाशी संबंधित असते.
कोणतंही विशेष काम न करता अचानक थकवा जाणवणं किंवा सतत अशक्त वाटणं हेही किडनीच्या त्रासाचं लक्षण असू शकतं. याशिवाय चालताना त्रास होणं किंवा झोपेच्या समस्या जाणवणं हे संकेतही दिसू शकतात.
वरील लक्षणांसोबतच किडनीचा त्रास असल्यास शरीरात आणखी काही बदल दिसू शकतात. त्यामध्ये पुढील लक्षणांचा समावेश होतो.
त्वचा कोरडी होणं आणि त्वचेवर खाज येणं
भूक न लागणं
मळमळ होणं किंवा उलट्या होणं
स्नायूंमध्ये गोळे येणं किंवा दुखणं
सतत उच्च रक्तदाब राहणं
बरगड्या आणि कंबरेच्या हाडांच्या मधल्या भागात दुखणं
सतत उचकी लागणं
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.