Rajasthan IAS-IPS Couple News : राजस्थानमधील एका वरिष्ठ IAS-IPS पती-पत्नीने भ्रष्टाचाराच्या मार्गाने करोडो रूपयांची संपत्ती जमवल्याचे उघडकीस आले आहे. अवघ्या दोन रुपयांत जमिनी खरेदी करून त्यावर ४० लक्झरी विला उभारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण घोटाळ्यातून या जोडप्याने ६.१६ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे आणि त्यातून वर्षाला तब्बल १.८० कोटी रुपये इतके भरभक्कम भाडे मिळत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. (Who is Shikhar Agarwal IAS, Who is Prashakha Mathur IPS)
वरिष्ठ आयएएस अधिकारी शिखर अग्रवाल आणि त्यांच्या आयपीएस पत्नी प्रशाखा माथूर यांच्या घरी एसीबीने छापा मारल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली. या नवरा-बायकोनं राजस्थानमध्ये ४० आलिशान व्हिला आणि कॉटेज खरेदी केल्याचे प्रकरण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. आयएएस अधिकाऱ्याने आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दोन मोठ्या रिसॉर्ट्समध्ये ६.१६ कोटी रुपयांना ४० मालमत्ता खरेदी केल्या. त्यानंतर त्यांनी त्याच मालमत्ता विकणाऱ्या कंपनीला त्या परत भाडेतत्त्वावर दिल्या. या प्रॉपर्टीच्या भाड्यातून या दाम्पत्याला दरवर्षी १.८० कोटी रुपयांचे भाडे मिळत असल्याचे उघड झाले आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राजस्थान सरकारने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) सखोल चौकशी करण्याची परवानगी दिली आहे. दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना सध्या 'पोस्टिंगच्या प्रतीक्षेत' (Awaiting Posting Orders - APO) ठेवण्यात आले आहे.
नेमकं काय प्रकरण आहे?
राजस्थानमधील उदयपूर आणि अलवर येथील दोन आलिशान रिसॉर्ट्सशी संबंधित हे संपूर्ण प्रकरण आहे. हे रिसॉर्ट्स गोयल फॅशन्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीद्वारे चालवले जातात. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, आयएएस अधिकारी शिखर अग्रवाल, त्यांच्या आयपीएस पत्नी प्रशाखा माथूर आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी अडीच वर्षांत कंपनीकडून मोठ्या संख्येने कॉटेज आणि व्हिला खरेदी केले. याची एकूण खरेदी किंमत अंदाजे ₹६.१६ कोटी असल्याचे वृत्त आहे. या व्यवहारातील धक्कादायक बाब म्हणजे, त्यांनी ज्या कंपनीकडून या मालमत्ता खरेदी केल्या होत्या, त्याच कंपनीला त्या तात्काळ परत भाड्याने दिल्या. या करारानुसार एकूण वार्षिक भाडे ₹१.८० कोटी असल्याचे म्हटले जाते.
फसवणूक कशी झाली?
एसीबीचे महासंचालक गोविंद गुप्ता म्हणाले की, राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी अग्रवाल यांनी गोयल फॅशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांसोबत गुन्हेगारी संगनमत करून आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे पुरावे समोर आले आहेत. त्यांनी स्वतःला आणि संबंधित कंपनीला अवाजवी लाभ मिळवून दिला. तसेच राज्य सरकारचे मोठे आर्थिक नुकसान केले. गुप्ता यांनी सांगितले की, ब्युरोने एका माध्यमातील वृत्ताचे आणि उद्योग विभागाकडून मिळालेल्या वस्तुस्थिती रिपोर्टचा सखोल अभ्यास केला. त्याव्यतिरिक्त गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्राथमिक चौकशी नोंदवणे आणि सुरुवातीच्या टप्प्यात समोर आलेल्या तथ्यांची सविस्तर चौकशी सुरू आहे.
उदयपूरमध्ये २० कॉटेज, अलवरमध्ये २० व्हिला
स्थानिक माध्यमाच्या वृत्तांनुसार आणि एसीबीच्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली. आरोपींनी मालमत्ता दोन वेगवेगळ्या टप्प्यांत खरेदी केली होती. उदयपूरमधील बुजरा रिसॉर्टमध्ये अग्रवाल आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर प्रत्येकी १५ लाख रुपयांना १० व्हिला खरेदी करण्यात आले होते. त्याचप्रमाणे, अलवरच्या अजबगड येथील अनंता रिसॉर्टमध्ये, अग्रवाल आणि त्यांच्या पत्नीच्या नावे प्रत्येकी ₹16.5 लाखांना आठ व्हिला, त्यांच्या दोन मुलांच्या नावे प्रत्येकी ₹15 लाखांना चार व्हिला आणि त्यांच्या सासरच्या मंडळींच्या नावे प्रत्येकी ₹16.5 लाखांना चार व्हिला खरेदी करण्यात आले. या मालमत्ता बाजारभावापेक्षा खूपच कमी किमतीत खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.