ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मंदिरात जाणे म्हणजे केवळ देवाचे दर्शन घेणे नव्हे, तर मनाला शांतता मिळवणे आणि आध्यात्मिक समाधान अनुभवणे होय. अनेकजण दररोज मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतात. मंदिरात जाताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते.
मंदिराबाहेरून देवासाठी नारळ किंवा फुले खरेदी करताना त्याचे पैसे आधीच द्यावेत. उधारीवर वस्तू घेण्याऐवजी स्वतःच्या पैशाने खरेदी केलेली वस्तू देवाला अर्पण करावी, अशी धार्मिक मान्यता आहे.
मंदिरात प्रवेश करताना उंबरठ्यावर पाय देणे टाळावे. काही धार्मिक परंपरांनुसार उंबरठ्याला पाय लावण्याऐवजी मंदिराच्या वरच्या चौकटीला स्पर्श करण्याची प्रथा आहे. चौकटीवर गणपतीचे स्थान आहे, अशी धार्मिक मान्यता आहे.
देवदर्शन करताना मन शांत आणि प्रसन्न ठेवावे. आपल्या मनातील इच्छा, भावना आणि अडचणी देवासमोर मनोभावे मांडाव्यात. प्रार्थना करताना दिखावा करण्यापेक्षा श्रद्धा आणि एकाग्रतेला महत्त्व द्यावे.
काही धार्मिक समजुतींनुसार मंदिरातून घरी आल्यानंतर लगेच हात-पाय धुणे टाळावे. असे केल्याने देवदर्शनातून मिळालेली सकारात्मक आणि आध्यात्मिक ऊर्जा अधिक काळ टिकून राहते, अशी श्रद्धा आहे.
मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर चप्पल किंवा बूट ठेवणे टाळावे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अडथळा निर्माण होऊ शकतो. तसेच चप्पल इतरांच्या पायाखाली येणार नाहीत किंवा कोणाच्याही वाटेत अडथळा ठरणार नाहीत, अशा ठिकाणी ठेवाव्यात.
मंदिरात गेल्यानंतर सतत मोबाईलवर बोलणे, मोठ्या आवाजात व्हिडिओ पाहणे किंवा रील्स बनवणे टाळावे. मंदिर हे प्रार्थना आणि शांततेचे ठिकाण आहे. त्यामुळे दर्शन घेताना मोबाईल सायलेंट मोडवर ठेवावा. काही मंदिरांमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंगवर बंदी असते. अशा नियमांचे पालन करावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.