Shreya Maskar
हिवाळ्यात बाजारात ताजी हिरवी मेथी मुबलक प्रमाणात मिळते. या मेथीपासून तुम्ही चविष्ट आणि पौष्टिक मेथी थालीपीठ बनवू शकता. नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या भुकेसाठी हा उत्तम पर्याय आहे.
मेथी थालीपीठ बनवण्यासाठी बारीक चिरलेली ताजी मेथी, ज्वारी-गव्हाचे पीठ, बेसन, कांदा, हिरव्या मिरच्या, तीळ, जिरे, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, तूप आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.
मेथी थालीपीठ बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ आणि बेसन एकत्र करा. त्यामध्ये चिरलेली मेथी, कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला.
आता त्यात हळद, तिखट, जिरे, तीळ आणि मीठ घालून सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. थोडे थोडे पाणी घालून मऊसर पीठ मळून घ्या. मेथी आणि कांद्यामुळे मिश्रणाला पाणी सुटू शकते, त्यामुळे पाणी जपून घाला.
हाताला थोडे पाणी किंवा तेल लावून पिठाचा गोळा घ्या. प्लास्टिक शीट किंवा ओल्या कापडावर गोलाकार थालीपीठ थापा. त्याला मध्ये छोटी छिद्रे करा.
गरम तव्यावर थालीपीठ टाका. दोन्ही बाजूंनी तेल किंवा तूप सोडून सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
गरमागरम मेथीचे थालीपीठ घरगुती लोणी, दही किंवा ताक, हिरव्या मिरचीचा ठेचा, लसूण चटणीसोबत खाऊ शकता. तुम्ही गरमागरम चहासोबतही याचा आस्वाद घेऊ शकता.