Shreya Maskar
हिवाळा सुरू झाला की शरीराला उष्णता आणि ऊर्जा हवी असते, त्यामुळे अनेकजण डिंक खाण्याचा सल्ला देतात. विशेषतः थंडीच्या दिवसांत नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी डिंकाचे लाडू उत्तम पर्याय ठरू शकतात.
डिंकाचे लाडू बनवण्यासाठी डिंक, गव्हाचे पीठ, गूळ, साजूक तूप , बदाम, काजू, खारीक पावडर , सुके खोबरे, खसखस , वेलची पूड आणि सुंठ पावडर इत्यादी साहत्य लागते.
डिंकाचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये थोडे तूप गरम करा. त्यामध्ये डिंक थोडा थोडा घालून मंद आचेवर तळून घ्या. डिंक फुलून कुरकुरीत झाल्यानंतर तो एका ताटात काढून थंड होऊ द्या.
तळलेला डिंक थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. डिंकाची पूड अगदी बारीक करू नका. कढईमध्ये तूप घालून त्यात गव्हाचे पीठ मंद आचेवर भाजा. पीठाचा रंग हलका सोनेरी होऊन छान सुगंध येईपर्यंत सतत ढवळत राहा.
बदाम आणि काजूचे बारीक तुकडे करून घ्या. थोड्या तुपामध्ये बदाम, काजू आणि खसखस भाजून घ्या. त्यानंतर सुके खोबरेही हलके भाजून घ्या.
आता भाजलेल्या गव्हाच्या पिठामध्ये डिंकाची पूड, सुकामेवा, खारीक पावडर, सुंठ पावडर आणि वेलची पूड घाला. सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र मिसळा.
एका भांड्यात थोडे तूप आणि गूळ घालून मंद आचेवर गरम करा. गूळ वितळल्यानंतर गॅस बंद करा. पाक जास्त घट्ट करू नका.
तयार मिश्रणामध्ये वितळलेला गूळ घालून व्यवस्थित मिक्स करा. मिश्रण कोमट असतानाच हाताने गोलाकार लाडू वळून घ्या. तयार लाडू ताटामध्ये ठेवून पूर्णपणे थंड होऊ द्या. त्यानंतर हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवा.