गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून लंडनला निघालेल्या एअर इंडिया विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात विमानातील क्रू मेंबर्ससह सर्व २४२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रवाशांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश होता. त्यांच्या निधनामुळे त्यांचे कुटुंबीय आणि जनतेवर शोककळा पसरली आहे.
अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे जाणारे हे विमान टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या दोन मिनिटांतच मेघानीनगरमधील डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळलं. अपघातानंतर हवेत काळ्या धुराचे लोट पसरले. अपघातानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य तात्काळ सुरू करण्यात आले. विमानात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील होते.
प्रवाशांच्या यादीनुसार विजय रुपाणी यांचे नाव १२व्या क्रमांकावर होते. त्यांच्या मृत्यूच्या आधीचा शेवटचा फोटो देखील समोर आला आहे. ते लंडनला त्यांच्या पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी निघाले होते. विजय रुपाणी हे सहा महिन्यांनी त्यांच्या बायकोला भेटायला जाणार होते. विजय रुपाणी यांच्या मृत्यूनंतर अनेक नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
या अपघातात डॉक्टरांच्या हॉस्टेलवर विमान कोसळल्याने पाच इंटर्न डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याप्रकरणी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, 'एअर इंडियाचं विमान टेक ऑफ केल्यानंतर काही मिनिटांत खाली येऊ लागलं. विमानतळावरून टेक ऑफ घेतलेलं विमान मेघाणीनगर परिसरात कोसळलं. या अपघाताने मेघाणी नगर परिसरात राहणाऱ्या लोकांचं मोठं नुकसान झालं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.