इजिप्तची राजधानी कैरोच्या दक्षिणेला रविवारी भीषण रेल्वे अपघात झाला. दोन प्रवासी ट्रेनची धडक झाली. या भीषण रेल्वे अपघातामध्ये आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला तर ८८ जण जखमी झाले. हा अपघात कैरोपासून सुमारे ५२ किलोमीटर अंतरावर असलेल्या गिझा प्रांतातील अल-अय्यात जिल्ह्यात झाला.
इजिप्तच्या परिवहन मंत्रालयाच्या माहितीनुसार, फयूम प्रांताकडे जाणाऱ्या एका प्रवासी ट्रेनने अस्वान प्रांताकडे जाणाऱ्या दुसऱ्या ट्रेनला पाठीमागून धडक दिली. या धडकेनंतर एक ट्रेन रुळावरून घसरली. नेमक्या कोणत्या ट्रेनचे डबे रुळावरून घसरले हे समजू शकले नाही. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून ८८ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
या अपघातानंतर इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांनी सोशल मीडिया पोस्ट करत शोक व्यक्त केला आणि तात्काळ चौकशीचे आदेश दिले. त्यांनी या अपघाताला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यास सांगितले. अपघातानंतर बचाव आणि मदत पथके घटनास्थळी पाठवण्यात आली. घटनास्थळी मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्याच अल-अय्यात जिल्ह्यात दोन मालगाड्यांची टक्कर झाली होती. ज्यात एक ट्रेन चालक आणि एक जण असे दोघे जण जखमी झाले होते.
दरम्यान, केनियातील माकुएनी येथे भीषण रस्ते अपघात झाला. भरधाव बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन किमान २२ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात झाला तेव्हा बसमधील प्रवासी एका अंत्यविधीवरून परत येत होते. याच महामार्गावर ३ आठवड्यांपूर्वी झालेल्या एका अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.