कॉक्रोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सोपवला राजीनामा
विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे सरकार झुकलं
जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्त केला. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राजीनामा दिल्याची माहिती दिली. शिक्षणमंत्र्याच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी राजीनामा दिल्यामागची कारणं स्पष्ट केली. 'मी माझ्या जबाबदारीपासून पळ काढला नाही.', असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या पत्रात असे लिहिले की, गेल्या ४ दशकांहून अधिक काळ ते विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण सुधारणेसाठी समर्पित आहेत. माझा नेहमीच असा विश्वास राहिला आहे की, एक मजबूत, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेली शिक्षण व्यवस्था ही कोणत्याही राष्ट्राच्या विकासाचा पाया असते.
धर्मेंद्र प्रधान यांनी या पोस्टमध्ये पुढे सांगितले की, '३ मे २०२६ रोजी झालेल्या नीट-यूजी परीक्षेत अनियमिततेच्या तक्रारी समोर येताच सरकारने तात्काळ कारवाई केली. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. परीक्षा रद्द करून ती पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आणि पुढील वर्षापासून नीट परीक्षा पूर्णपणे संगणक-आधारित (CBT) पद्धतीने घेतली जाईल, अशी घोषणा करण्यात आली.'
तसंच, '२० लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी निष्पक्ष आणि सुरळीत परीक्षा घेणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य होते. या उद्देशाने केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, विद्यार्थी आणि पालकांच्या सहकार्याने २१ जून २०२६ रोजी फेरपरीक्षा यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. १६ जुलै रोजी जाहीर झालेल्या निकालांमध्ये गरीब आणि वंचित कुटुंबांतील अनेक हुशार विद्यार्थी यशस्वी झाल्याचे दिसून आले. पण जबाबदारीच्या पदांवरील काही जणांनी विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे मी दुःखी झालो.', असे प्रधान यांनी सांगितले.
शिक्षणमंत्रीपदाच्या राजीनाम्यात धर्मेंद्र प्रधान यांनी असे देखील सांगितले की, 'गेल्या १० दिवसांतील घटनांमुळे मी अत्यंत व्यथित झालो आहे. हा त्यांच्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा प्रश्न नसून देशातील तरुणांच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य कायदेशीर वाद आणि राजकीय संघर्षांमध्ये अडकू नये किंवा त्यांच्या अभ्यासापासून विचलित होऊ नये अशी माझी इच्छा आहे. याच भावनेतून मी पदत्याग करण्याचा निर्णय घेतला.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.