जपानमध्ये मध्यरात्री ५.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
शिजूओका प्रांताच्या पश्चिम भागात भूकंपाचे केंद्र
जमिनीपासून सुमारे ४० किलोमीटर खोलीवर भूकंपाची नोंद
ऐची, नागानो आणि गिफू प्रांतांमध्ये भूकंपाचे धक्के
जपानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. रविवारी पहाटे झालेल्या 5.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या भूकंपात अनेक लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जपानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या दुर्घटनेत अनेक लोकांना दुखापत झाली आहे.
जपानच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार रविवारी मध्यरात्री १ वाजून ४ मिनिटांनी भूकंप झाला. शिजूओका प्रांताच्या पश्चिम भागात या भूकंपाचे केंद्र होते. जमिनीपासून सुमारे ४० किलोमीटर खोलीवर भूकंपाची हालचाल निर्माण झाली होती.
या भूकंपाचा परिणाम मध्य जपानमधील अनेक भागांत जाणवला. ऐची प्रांतातील चिता परिसरात भूकंपाची तीव्रता सर्वाधिक नोंदवण्यात आली. ५ च्या वरच्या स्तराची तीव्रता जाणवली. तर ऐची, नागानो आणि गिफू या प्रांतांमधील काही भागांत ५ च्या खालच्या स्तराचे धक्के बसले. मुख्य भूकंपानंतर परिसरात काही लहान धक्केही जाणवले. या धक्क्यांना आफ्टरशॉक असे म्हटले जाते. त्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण होते.
भूकंपाची माहिती मिळताच जपान सरकारने तातडीने हालचाली सुरू केल्या. भूकंप झाला त्या भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि मदतकार्य योग्य पद्धतीने राबवण्यासाठी आपत्कालीन संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. जखमी नागरिकांना उपचार देण्याचे काम सुरू असून प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. सध्या संबंधित यंत्रणा सतर्क असून भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची माहिती गोळा केली जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.