संयुक्त किसान मोर्चाने दिल्लीमध्ये मोर्चाची घोषणा केली. सोमवारी सकाळपासून नोएडामधील हजारो शेतकरी आपल्या मागण्यांसाठी दिल्लीच्या दिशेने मोर्चा काढत निघाले आहेत. त्यामुळे नोएडामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. नोएडा ट्राफिक पोलिसांनी यामुळे नियमावली जाहीर करत दिल्ली-नोएडा सीमेवर कडक बंदोबस्त वाढवला आहे.
दिल्लीमध्ये शेतकरी मोर्चा घेऊन येणार असल्यामुळे उत्तर प्रदेशच्या चिल्ला सीमेवर पोलिस आणि आरएएफ तैनात करण्यात आले आहे. दिल्ली-उत्तर प्रदेशच्या सर्व प्रमुख आणि छोट्या सीमेवर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हजारो शेतकरी आपल्या मागण्या घेऊन दिल्लीकडे मोर्चा घेऊन निघाले आहेत. संयुक्त किसान मोर्चाशी संबंधित शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चा काढला असून ते संसदेला घेराव घालण्याच्या तयारीत आहेत. विविध संघटनांचे शेतकरी नोएडाच्या महामाया फ्लायओव्हरजवळ दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एकत्र येतील, असे सांगण्यात येत आहे. याशिवाय अन्य काही शेतकरी संघटना ग्रेटर नोएडाच्या परी चौकातून ट्रॅक्टर ट्रॉलीसह मोर्चा घेऊन निघाले आहेत.
या आंदोलक शेतकऱ्यांनी आपल्या ५ कलमी मागण्यांबाबत प्राधिकरणासमोर महापंचायत घेतली होती. त्यात जुन्या भूसंपादन कायद्यानुसार बाधित शेतकऱ्यांना १० टक्के भूखंड आणि ६४.७ टक्के वाढलेली भरपाई मिळावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे. १ जानेवारी २०१४ नंतर संपादित केलेल्या जमिनीवर बाजारभावाच्या चौपट मोबदला आणि २० टक्के भूखंड द्यावा. यासोबतच सर्व जमीनदार आणि भूमिहीन शेतकऱ्यांच्या मुलांनाही रोजगार आणि पुनर्वसनाचा लाभ मिळावा. उच्चाधिकार समितीने पारित केलेल्या मुद्द्यांवर शासन आदेश काढावेत.
शेतकऱ्यांच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नोएडाच्या महामाया उड्डाणपुलाभोवती वाहतूक वळवण्यात आली आहे. त्याचबरोबर अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून अनेक शाळांमध्ये ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. आंदोलनामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात पोलिस दल आणि पीएसी तैनात करण्यात आले आहे. वाहतूक कोंडी लक्षात घेता पोलिसांनी पर्यायी मार्ग देखील जाहीर केले आहेत. चिल्ला बॉर्डर, डीएनडी, महामाया फ्लायओव्हरजवळही मोठ्या प्रमाणात पोलिस आणि पीएसी तैनात करण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.