जपानमध्ये गेल्या काही महिन्यांपासून भूकंपाचे जोरदार हादरे बसत आहेत. त्यामुळं नागरिकांमध्ये प्रचंड भीती आहे. समुद्रातील उंच लाटा आणि त्सुनामीच्या धोक्यामुळे २०११ च्या भीषण दुर्घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. त्यातच आता आणखी एक नैसर्गिक संकट जपानमध्ये विनाश घडवण्यासाठी आलंय. पॅसिफिक महासागरात एक अत्यंत शक्तिशाली आणि विनाशकारी चक्रीवादळ तयार झालं आहे. ज्याला ‘डॉल्फिन’ नाव देण्यात आले आहे. हे चक्रीवादळ आधी जपान आणि नंतर चीनमध्ये धडकेल, त्यामुळं या दोन्ही देशांच्या किनारी भागात प्रचंड नुकसान होण्याची भीती आहे.
जपानच्या हवामान विभागाने (JMA) चक्रीवादळाचा वेग आणि त्याची तीव्रता लक्षात घेऊन हाय अलर्ट आणि इमर्जन्सी जाहीर केली आहे. ओकिनावा आणि कागोशिमा राज्यातील सुमारे २.६ लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. ५०० हून अधिक विमान उड्डाणे रद्द करून लोकांना घरामध्येच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. डॉल्फिन चक्रीवादळ धडकण्यापूर्वीच किनारी भागात १४४ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत आणि २०० किलोमीटर वेगाचे वाऱ्याचे झोत येत आहेत. या वादळाच्या प्रभावामुळे १४,००० हून अधिक घरांचा वीजपुरवठा खंडित झाला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
जपानच्या हवामान विभागानुसार (JMA), डॉल्फिन वादळ जपानच्या ओकिनावा राज्यातील कुमे बेटावर घोंघावत आहे. ते राजधानीच्या शहरापासून १६० किलोमीटर अंतरावर उत्तर-पश्चिम दिशेला आहे. हे बेट ओलांडून डॉल्फिन वादळ पूर्व चीन समुद्रात पोहोचेल आणि तिथून चीनच्या पूर्व किनाऱ्याकडे सरकेल. चीनमध्ये या वादळाच्या वाऱ्याचा वेग ५० ते १६२ किमी प्रतितास असण्याची शक्यता आहे. तसेच २१६ किमी प्रतितास वेगाचे वाऱ्याचे झोत येऊ शकतात. समुद्रात १२ ते १६.५ मीटर उंच धोकादायक लाटा उसळतील, असा अंदाज आहे. येत्या काही तासांत हे वादळ आणखी तीव्र होऊ शकते. त्यामुळे अतिमुसळधार पावसाचीही शक्यता आहे.
हवामान विभागानुसार, डॉल्फिन वादळ आणि त्यामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रसिद्ध टोयोटा कंपनीने सुरक्षिततेसाठी ९ फॅक्टरी तात्पुरत्या स्वरूपात बंद केल्या आहेत. हे वादळ चीनच्या पूर्व किनारपट्टीवरील झेजियांग आणि उत्तर फुजियान भागात केंद्रित होऊ शकतेय. डॉल्फिन वादळ ९ ऑगस्टच्या दुपारी किंवा संध्याकाळपासून ते सोमवार १० ऑगस्टच्या सकाळपर्यंत धडकेल. शांघाय, झेजियांग, फुजियान, जिआंगसू, अनहुई आणि जिआंगशी ही शहरे या वादळाच्या तडाख्यात सापडण्याची शक्यता आहे.
पूर्व आणि मध्य चीनमधील अनेक मोठ्या शहरांमध्ये हाय अलर्ट लागू करण्यात आला आहे. वेनझोउ हे या वादळाचे मुख्य केंद्र असेल आणि जेव्हा वादळ या शहरातून पुढे सरकेल तेव्हा १४० ते १७० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच मुसळधार पाऊसही कोसळू शकतो. चीनच्या जिनपिंग सरकारने पूर्व किनारपट्टीवरील बंदरे आणि फेरी मार्ग बंद केले आहेत. बुधवारनंतर वादळाची तीव्रता कमी होईल, असा अंदाज आहे.
'डॉल्फिन' हे नाव कोणी दिले?
पॅसिफिक महासागरात तयार झालेल्या विनाशकारी चक्रीवादळाला 'डॉल्फिन' हे नाव हाँगकाँगने दिले. हाँगकाँगच्या मस्कटमधील ‘चायनीज व्हाईट डॉल्फिन’च्या संदर्भावरून हे नाव दिले गेले. जागतिक हवामान संघटनेच्या (WMO) नियमांनुसार, जपानमध्ये आलेल्या अशा प्रकारच्या वादळाला चौथ्यांदा 'डॉल्फिन' नाव देण्यात आले आहे. यापूर्वी २००८, २०१५ आणि २०२० मध्ये आलेल्या वादळाचे नावही डॉल्फिन होते.
जागतिक हवामान संघटनेनुसार (WMO), पॅसिफिक महासागरात आलेले डॉल्फिन वादळ प्रचंड वेगाने जपानला धडकेल आणि आता त्याहून अधिक वेगाने चीनला तडाखा देण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या वेगामुळं बंगालच्या उपसागरात तयार होणारे कमी दाबाचे पट्टे अधिक कमकुवत होऊ शकतात, त्यामुळे भारतातील काही राज्यांमध्ये कमी प्रमाणात पाऊस पडू शकतो. धक्कादायक म्हणजे पाऊसच गायब होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.