चिराग पासवान यांची नितीश कुमार सरकारवर जोरदार टीका
बिहारमध्ये गेल्या काही दिवसांत ५० पेक्षा अधिक हत्या
विधानसभा निवडणुकीआधीच राजकीय वातावरण तापलं
बिहारमध्ये आगामी दोन महिन्यांत विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याआधीच तेथील राजकारण तापलं आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांकडून परस्परांवर आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. दुसरीकडे सरकारला पाठिंबा देणाऱ्या पक्षाच्या नेत्यानंच टीकेची झोड उठवली आहे. जनशक्ती पक्ष (रामविलास) प्रमुख आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवर चिंता व्यक्त करतानाच सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्या राज्यात गुन्हेगारी बोकाळली आहे, त्या राज्याच्या सरकारला आम्ही पाठिंबा देतोय याचं दुःख होतंय, असं पासवान म्हणाले.
बिहारमध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून हत्यांच्या घटनांचं सत्र सुरूच आहे. गेल्या महिनाभरात ५० पेक्षा जास्त हत्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. दिवसाढवळ्या गोळीबार करणं, रुग्णालयातील हत्याकांड अशा घटनांनी बिहारमधील लोक दहशतीत आहेत. त्यामुळं राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, तसेच सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आता तर सरकारला पाठिंबा देणाऱ्या राजकीय पक्षांनीही सरकारला सवाल करणं सुरू केलं आहे.
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवर चिंता व्यक्त केली आहे. ज्या प्रकारे गुन्हे घडत आहेत, हे पाहता प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गुन्हेगारांसमोर गुडघे टेकल्याचे दिसते. या घटनांचा निषेध करणं आवश्यकच आहे, पण अशा घटना सातत्याने का घडतात? यावरही गांभीर्यानं चर्चा व्हायला हवी, याकडं चिराग पासवान यांनी लक्ष वेधलं. गुन्हेगारी घटनांचं सत्र असंच सुरू राहिलं तर परिस्थिती भयावह होईल, नव्हे तर परिस्थिती भयंकर झाली आहे, अशी भीतीही चिराग पासवान यांनी व्यक्त केली.
बिहारमध्ये निवडणुका होऊ घातल्यात आणि त्यामुळंच अशा गुन्हेगारी घटना वाढल्या आहेत, असं बोललं जात आहे. त्यावर चिराग पासवान यांनी प्रतिक्रिया दिली. निवडणुकांमुळं गुन्हेगारी वाढल्याचं बोललं जात असेल असं होऊ शकतं, असंही पासवान म्हणाले. सरकारची बदनामी करण्याचं षडयंत्र असू शकतं, पण तरीही गुन्हेगारी रोखण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे, हे सुद्धा पासवान यांनी निक्षून सांगितलं.
सरकारने या परिस्थितीचं गांभीर्य ओळखून वेळीच योग्य आणि कठोर पावले उचलायला हवीत, असं आवाहन मी करत आहे. ज्या ठिकाणी गुन्हेगारी वाढलीये, तेथील सरकारला पाठिंबा देतोय याचं मला दुःख होत आहे. आता यांच्या हाताबाहेर परिस्थिती चालली आहे. लोक त्रस्त झाले आहेत, अशा शब्दांत पासवान यांनी नितीश कुमार सरकारवर हल्लाबोल केला. पासवान हे गेल्या काही दिवसांपासून सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. याआधीही चिराग पासवान यांच्या पक्षाच्या खासदारांनीही कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील सरकारकडून शिकवण घ्यावी, असा सल्लाही दिला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.