अमेरिकेच्या दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. शनिवारी लॉस एंजिल्समध्ये 5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती समोर आलीये. लॉस एंजिल्स विमानतळाच्या आत छताचे टाइल्स कोसळले, तर एका रिफायनरीमध्ये आग लागल्याचा दावा करण्यात आला आहे. भूकंपाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
भूकंपानंतर काही वेळातच अनेक ठिकाणी पुन्हा धक्के जाणवले. 'सीएनएन'च्या वृत्तानुसार, भूकंपानंतर अवघ्या 45 मिनिटांत चार वेळा आफ्टरशॉक म्हणजेच भूकंपानंतरचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की इमारती हादरल्या, दुकानांमधील सामान खाली पडले. भीतीमुळे अनेक नागरिक घराबाहेर आणि दुकानांमधून बाहेर पडले. दरम्यान आतापर्यंत या भूकंपात कोणाचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली नाहीये.
भूकंपानंतर लॉस एंजिल्स अग्निशमन विभागाने तातडीची भूकंप प्रतिसाद यंत्रणा सुरू केली. शहरातील सर्व 106 अग्निशमन केंद्रांमधील कर्मचाऱ्यांना इमारती आणि महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी करण्यासाठी पाठवण्यात आले.
लॉस एंजिल्स विमानतळाच्या टर्मिनल-7 मध्ये काही काचा फुटल्या तर छताचे काही पॅनल खाली कोसळले. पण विमानतळावरील विमानांची ये-जा सुरूच होती आणि उड्डाणांवर परिणाम झाला नाही. मॅनहॅटन बीच आणि हर्मोसा बीचमधील समुद्रकिनाऱ्यांवरील पिअर म्हणजेच समुद्रात बांधलेले पूल खबरदारी म्हणून बंद करण्यात आले. अधिकाऱ्यांनी भूकंपामुळे सुनामीचा कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट केलं.
अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेने (USGS) 4 किंवा त्यापेक्षा जास्त तीव्रतेचे आफ्टरशॉक येण्याची 30 टक्के शक्यता वर्तवली होती. लॉस एंजिल्समध्ये याआधी 2014 मध्ये 5.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यामुळे शनिवारचा भूकंप गेल्या 12 वर्षांतील या भागातील सर्वात शक्तिशाली भूकंपांपैकी एक मानला जात आहे. कॅलिफोर्निया हा भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील भाग असल्याने या परिसरात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.