हैदराबादला मुंबई, बंगळुरू आणि चेन्नईशी जोडणारे तीन हायस्पीड रेल कॉरिडॉर
मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ सुमारे 40 मिनिटांपर्यंत कमी होण्याची शक्यता
मुंबई-हैदराबाद, हैदराबाद-बंगळुरू आणि हैदराबाद-चेन्नई हे प्रस्तावित प्रमुख कॉरिडॉर
हैदराबाद हे बुलेट ट्रेनचे एक प्रमुख केंद्र बनणार आहे. नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन (NHSRCL) हैदराबादमध्ये मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नईशी जोडणारे तीन हाय-स्पीड रेल कॉरिडॉर उभारणार आहे. हे कॉरिडॉर तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमधील २५ हून अधिक प्रमुख शहरांना जोडतील.
या प्रकल्पामुळे चेन्नई, बेंगळुरू, पुणे आणि ठाणे यांसारख्या प्रमुख शहरांना हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी मिळेल. सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR), LiDAR सर्वेक्षण आणि मार्गाची निश्चितीची कामे वेगाने सुरू आहेत. याला लवकरच त्याला मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. दिल्ली आणि मुंबईसह देशभरातील सर्व प्रमुख शहरांना जोडण्याच्या उद्देशाने सरकारने अर्थसंकल्पात सात हाय-स्पीड कॉरिडॉर्सची घोषणा केली होती. त्यानुसार सर्वेक्षणाची कामे सुरू आहेत.
हैदराबादमधील बुलेट ट्रेनचे मुख्य टर्मिनल राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ म्हणजेच शमशाबाद किंवा कोकापेट एसईझेड (SEZ) परिसरात उभारले जाऊ शकते. यामुळे मेट्रो, विमानतळ आणि रिंग रोड यांना जोडणारी बहु-विध (multi-modal) वाहतूक व्यवस्था उपलब्ध होईल. एनएचएसआरसीएलने (NHSRCL) या कॉरिडॉर्ससाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR), लिडार (LiDAR) सर्वेक्षण आणि अलाइनमेंट अभ्यास यांसारखी कामे आधीच पूर्ण केली झाली आहेत.
मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन मार्ग ७११ ते ७६७ किलोमीटरचा आहे. हा मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर प्रवासाचा वेळ १२ तासांवरून केवळ ३.५ तासांपर्यंत कमी होईल. या बुलेट ट्रेनसाठी प्रस्तावित स्थानकांमध्ये मुंबई (बीकेसी), नवी मुंबई, लोणावळा, पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती, सोलापूर, कलबुर्गी (गुलबर्गा), विकाराबाद आणि हैदराबाद यांचा समावेश आहे. मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवासही केवळ ४० मिनिटांवर येईल. हा मार्ग महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या तीन राज्यांमधून जाईल.
हैदराबाद-बेंगळुरू मार्ग ६१० किमी लांबीचा असून यामुळे सध्या १० ते १२ तास लागणारा प्रवास अवघ्या २.५ तासांवर येईल. या मार्गावरील स्थानकांमध्ये महबूबनगर, कर्नूल, अनंतपूर, चिक्कबल्लापूर आणि बेंगळुरू यांचा समावेश असेल. हैदराबाद-चेन्नई बुलेट ट्रेन आंध्र प्रदेशची राजधानी असलेल्या अमरावतीमधून जाईल. ७४५ किमीचा हा मार्ग २.५ ते ३ तासांत पार करता येऊ शकेल.
हा मार्ग हैदराबाद ते चेन्नई असा असू शकतो. शमशाबाद, हलिया, दाचेपल्ली, अमरावती, गुंटूर, ओंगोल, नेल्लोर व तिरुपती या ठिकाणांवरून जाऊ शकतो. हा हाय-स्पीड कॉरिडॉर तेलंगणा, आंध्र प्रदेशातील रायलसीमा प्रदेश आणि कर्नाटक यांना जोडत, भारतातील दोन मोठ्या आयटी (IT) हब्सदरम्यान जलद दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून देईल.
हैदराबादमधील मुख्य टर्मिनस स्टेशन शमशाबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ उभारण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे हवाई आणि रेल्वे संपर्क व्यवस्था एकमेकांशी जोडली जाईल. त्याचप्रमाणे, दिल्ली-वाराणसी बुलेट ट्रेन मार्गासाठी नोएडा विमानतळावरही बुलेट ट्रेन स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव आहे.
तेलंगणासह हे जाळे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांना जोडेल. सर्वेक्षण, सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) आणि अंतिम मार्ग निश्चित झाल्यानंतरच हैदराबाद बुलेट ट्रेनबाबतचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. हा मार्ग औद्योगिक केंद्रे आणि तिरुपतीसारखी प्रमुख धार्मिक स्थळे यांना जोडणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.