बिहारच्या राजकारणात सध्या मंत्री अशोक चौधरी यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली आहे. अशोक चौधरी यांनी सहाय्यक प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला आहे. अशोक चौधरी ए.एन. कॉलेजमध्ये ते राज्यशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. मात्र, मंत्री आणि विधान परिषदेचे सदस्य असतानाच त्यांनी प्राध्यापकाची नोकरी स्वीकारल्यामुळे हा विषय चर्चेत आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, याच वर्षी 17 फेब्रुवारी रोजी अशोक चौधरी यांनी ए.एन. कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर त्यांच्या नियुक्तीबाबत आणि नोकरीच्या नियमांबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले. विशेष म्हणजे, मंत्रीपद आणि विधान परिषदेचे सदस्यत्व सांभाळत असताना त्यांनी विद्यापीठाच्या महाविद्यालयात नोकरी कशी स्वीकारली, असा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला होता.
या प्रकरणात विद्यापीठाच्या सिंडिकेटकडून त्यांना लियन म्हणजेच मूळ पदावरील नोकरी कायम ठेवून काही काळ दुसरी जबाबदारी सांभाळण्यासाठी आवश्यक असलेली मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांच्या प्राध्यापक पदावरून वाद निर्माण झाला. विद्यापीठाची परवानगी नसताना त्यांनी हे पद स्वीकारल्याचा मुद्दाही चर्चेत आला.
दरम्यान, या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला घेरण्यास सुरुवात केली होती. लोकभवनाकडूनही या विषयावर टिप्पणी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आगामी बिहार विधानमंडळाच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता होती. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच अशोक चौधरी यांनी प्राध्यापक पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. अशोक चौधरी यांनी आपला राजीनामा महाविद्यालयाकडे सादर केला आहे. मात्र,विद्यापीठाकडून या राजीनाम्याला अधिकृत मंजुरी मिळणे अद्याप बाकी आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.