ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुंबई म्हटलं की अनेक प्रसिद्ध बाजारपेठा डोळ्यांसमोर येतात. त्यापैकीच एक म्हणजे दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार! खरेदी, खाद्यसंस्कृती आणि जुन्या इमारतींसाठी ओळखला जाणारा हा परिसर अनेक वर्षांपासून मुंबईच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग आहे.
मात्र, या बाजाराचे नाव भेंडी या भाजीवरून पडले आहे का, असा प्रश्न अनेकांना पडतो. या नावामागे ब्रिटिश काळातील उल्लेख, स्थानिक उच्चार आणि काही ऐतिहासिक दंतकथा जोडल्या गेल्या आहेत. नेमका काय आहे भेंडी बाजाराच्या नावाचा इतिहास? जाणून घेऊयात.
भेंडी बाजार नावाच्या मागे पहिला कथा अशी की, ब्रिटिश काळात क्रॉफर्ड मार्केटच्या मागील बाजूच्या परिसराला 'बिहाइंड द बझार' (Behind the Bazaar) असे संबोधले जायचे. स्थानिक लोकांच्या उच्चारातून या शब्दांचे रूपांतर (अपभ्रंश होत) हळूहळू 'भेंडी बाजार' असे झाले, असे सांगितले जाते.
आणखी एक ऐतिहासिक संदर्भ असा की, जुन्या मुंबईत डोंगरीच्या वायव्य दिशेला 'भेंडी' नावाच्या झाडांची लागवड होती. या झाडांच्या अस्तित्वामुळे परिसराला भेंडी बाजार हे नाव मिळाले, असा उल्लेख आहे. विशेष म्हणजे, या झाडांचा भाजी म्हणून वापरल्या जाणाऱ्या भेंडीशी संबंध नाही.
भेंडी बाजाराच्या नावामागे उल्लेखलेले भेंडीचे झाड म्हणजे Thespesia populnea. या झाडाला इंग्रजीमध्ये Indian Tulip Tree असेही म्हणतात. जुन्या काळात मुंबईच्या काही भागांमध्ये अशा झाडांची लागवड होती. त्यामुळे मुंबईतील अनेक ठिकाणांची नावे वनस्पती आणि झाडांवरून पडल्याचे दिसून येते.
भेंडी बाजार हा दक्षिण मुंबईतील जुन्या वस्तींपैकी एक आहे. १८०३ मध्ये फोर्ट परिसरात लागलेल्या मोठ्या आगीच्या पार्श्वभूमीवर ब्रिटिश प्रशासनाने शहरातील काही भागांमध्ये नव्या वस्त्या विकसित करण्याचे नियोजन केले. व्यापार आणि बंदराशी संबंधित कामगारांना राहण्यासाठी या परिसराचा विकास झाला.
येथे विविध खाद्यपदार्थ, कपडे, हार्डवेअर, पुरातन वस्तू आणि इतर वस्तूंची दुकाने प्रसिद्ध आहेत. त्यामुळे हा परिसर मुंबईच्या सांस्कृतिक आणि व्यापारी इतिहासातील महत्त्वाचा भाग बनला आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.