श्रीनगरचे खासदार आगा रुहुल्लाह मेहदी यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली
३ नोव्हेंबर २०२६ रोजी लोकसभा अध्यक्षांकडे राजीनामा देण्याचे त्यांनी जाहीर केले
राजीनाम्यानंतर श्रीनगर लोकसभा पोटनिवडणूक अपक्ष म्हणून लढण्याचे संकेत
फारूक अब्दुल्ला यांना पत्र लिहून त्यांनी पक्षाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली
जम्मू-काश्मीरच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. श्रीनगर लोकसभा मतदारसंघाचे नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार आगा रुहुल्लाह मेहदी यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे म्हटलं. “खोटेपणा आणि विश्वासघाताचा भाग बनायचे नाही,” अशी स्पष्ट भूमिका रुहुल्लाह यांनी घेतली आहे.
आगा रुहुल्लाह यांनी सांगितले की, 3 नोव्हेंबर 2026 रोजी ते लोकसभा अध्यक्षांसह नॅशनल कॉन्फरन्सकडे अधिकृतपणे आपला राजीनामा सुपूर्द करतील. विशेष म्हणजे, हा दिवस त्यांचे वडील आगा सैयद मेहदी यांच्या 26व्या पुण्यतिथीचा दिवस आहे. दहशतवाद्यांनी त्यांच्या वडिलांची हत्या केली होती. राजीनामा दिल्यानंतर श्रीनगर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचे संकेतही रुहुल्लाह यांनी दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या निर्णयाचा जम्मू-काश्मीरच्या आगामी राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत आगा रुहुल्लाह यांनी श्रीनगर मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यांना 3,56,866 मते मिळाली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे (PDP) उमेदवार वहीद पारा यांना 1,68,450 मते मिळाली होती. दरम्यान, पक्षाध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला यांना थेट पत्र लिहून रुहुल्लाह यांनी आपली नाराजी व्यक्त केली. हे पत्र त्यांनी सोशल मीडियावरही व्हायरल केले. जम्मू-काश्मीरच्या राज्याच्या दर्जाबाबत पक्षाची भूमिका आता भाजपपेक्षा वेगळी राहिलेली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
25 ऑगस्ट रोजी श्रीनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना फारूक अब्दुल्ला यांनी, “आपण किती काळ गुलाम राहणार? कधीतरी स्वतःच्या पायावर उभे राहावे लागेल,” असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा संदर्भ देत रुहुल्लाह यांनी म्हटले की, या शब्दांनी त्यांच्या मनाला खोलवर स्पर्श केला. मात्र, जम्मू-काश्मीरच्या हक्कांसाठी आवाज उठवताना भाजपसमोर गयावया करण्याची भूमिका स्वीकारावी लागत असल्याची भावना अनेकांच्या मनात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आगा रुहुल्लाह यांच्या या निर्णयामुळे नॅशनल कॉन्फरन्समधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले असून, आगामी काळात पक्ष नेतृत्व यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.