NH-31 Highway Accident : बिहारमध्ये कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात ३ पोलिसांसह ४ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. येथील बेगुसरायमध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या कार आणि ट्रक यांच्यात जोरात धडक झाली. यामध्ये तीन पोलिसांचा आणि कारमधील एका खासगी चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच, बेगुसरायचे एसपी मनीष कुमार आणि सदरचे डीएसपी आनंद पांडे यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा अपघात साहेबपूर कमल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बख्दा येथे एनएच ३१ जवळ झाल्याची माहिती मिळाली आहे. मृतांमध्ये रतवारा पोलीस ठाण्याचे प्रभारी साजन पासवान, बेल्लारी पोलीस ठाण्याचे प्रभारी नीरज कुमार, अरार पोलीस ठाण्याचे प्रभारी ज्ञानेंद्र अमरेंद्र आणि खासगी कारचा चालक ज्योतीश कुमार यांचा समावेश आहे.
स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, सर्वजण गुरुवारी रात्री उशिरा पाटणा येथे एक दिवसीय प्रशिक्षण पूर्ण करून वाहनाने मधेपुरा जिल्ह्यात परतत होते. भरधाव वेगात असलेली कार अनियंत्रित झाली आणि मागून एका ट्रकला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, ज्ञानेंद्र अमर आणि नीरज कुमार तसेच चालक ज्योतीश कुमार यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी साजन पासवान यांना स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केले, पण उपचारादरम्यान थोड्याच वेळात त्यांचा मृत्यू झाला.
वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
तीन पोलीस अधिकाऱ्यांसह चार जणांच्या मृत्यूची बातमी मिळताच पोलीस दलात खळबळ उडाली. या अपघाताची माहिती मिळताच बेगुसरायचे एसपी मनीष कुमार घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला. अपघाताचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन (postmortem) साठी पाठवण्यात आले आहेत.
बेगुसरायचे डीआयजी शैलेश कुमार आणि मधेपुराचे एसपी देखील सदर रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास केला. घटनेबाबत बेगुसरायचे एसपी मनीष यांनी सांगितले की, सर्व पोलीस ठाणे प्रभारी त्यांच्या चालकांसह पाटण्याहून मधेपुराला परतत असताना अपघात झाला. त्यात तीन पोलिसांचा आणि चालकाचा मृत्यू झाला. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.