आंध्र प्रदेशमध्ये २९ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या भीषण रेल्वे अपघाताचा चौकशी अहवाल आला आहे. लोको पायलटच्या निष्काळजीपणामुळं ही दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. पॅसेंजर ट्रेनचा लोकोपायलट आणि सहायक लोको पायलट हे दोघेही मोबाइल फोनवर लाइव्ह क्रिकेट सामना बघत होते, अशी खळबळजनक माहिती तपासातून समोर आली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) दोन पॅसेंजर ट्रेनची (Train Accident) धडक होऊन भीषण अपघात झाला होता. या भीषण अपघातात १४ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा चौकशी अहवाल समोर आला असून, लोको पायलटचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचं उघड झालं आहे. स्वतः रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी ही माहिती दिली. दोन पॅसेंजर ट्रेनची धडक झाली होती. त्यातील एका ट्रेनचा लोकोपायलट आणि त्याचा सहकारी दोघेही फोनवर क्रिकेट सामना बघत होते, अशी माहिती त्यांनी दिली.
रेल्वे अपघाताच्या (Railway Accident) घटनेनंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांद्वारे तपास सुरू झाला होता. दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी रेल्वे प्रशासनातर्फे प्राथमिक चौकशी केली होती. त्यात रायगड पॅसेंजर ट्रेनचा लोको पायलट (Loco Pilot) आणि सहायकाला जबाबदार ठरवण्यात आलं होतं. आता ते दोघेही मोबाइलवर क्रिकेट सामना बघत होते अशी धक्कादायक बाब समोर आली आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेच्या नवीन सुरक्षा प्रणालीबाबत माहिती दिली. पॅसेंजर ट्रेनचा लोको पायलट आणि सहायक दोघेही मोबाइलवर क्रिकेट सामना बघत असल्यामुळं त्यांचं लक्ष विचलित झाल्याची बाब समोर आली आहे. हे रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन नव्या सुरक्षा प्रणालीवर काम करत आहे. ज्यामुळं कोणत्याही प्रकारच्या 'डिस्ट्रॅक्शन'ची माहिती कळू शकते. लोको पायलट आणि सहायक ट्रेन चालवताना संपूर्ण लक्ष केंद्रीत करत आहेत की नाहीत, हे या सुरक्षा प्रणालीमुळं सुनिश्चित करता येईल, असेही रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, आम्ही सुरक्षिततेवर लक्ष केंद्रीत करणं सुरूच ठेवू. आम्ही प्रत्येक घटनेचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारच्या दुर्घटना पुन्हा घडू नयेत म्हणून त्यावर उपाययोजना करतो.
रेल्वे प्रशासनानं प्राथमिक चौकशीत पॅसेंजर ट्रेनच्या अपघाताला लोको पायलट आणि सहायकाला जबाबदार धरलं होतं. दोघांनीही नियमांचं उल्लंघन करून डिफेक्टिव्ह ऑटो सिग्नल पार केलं आणि पुढे उभ्या असलेल्या विशाखापट्टणम पलासा ट्रेनला पाठीमागून धडक दिली होती, असं समोर आलं होतं. आंध्र प्रदेशच्या विजयनगरम जिल्ह्याच्या कंटाकापल्ली येथे हावडा-चेन्नई मार्गावर झाला होता. यात १४ जणांचा मृत्यू आणि ५० हून अधिक प्रवासी जखमी झाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.