Maternity Leave saam tv
देश विदेश

Maternity Leave: मुलाच्या जन्मानंतर महिलांच्या करिअरला ब्रेक? बाळंतपणाची रजा संपताच 25 टक्के महिला सोडतात नोकरी

Indian Working Mothers: भारतात आईला सरासरी 130 दिवसांची तर वडिलांना फक्त 7 दिवसांची पालकत्व रजा मिळते. Deel च्या अहवालानुसार, आई-वडिलांच्या रजेतील तफावतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. बाळंतपणानंतर नोकरी सोडणाऱ्या महिला आणि पुरुषांची आकडेवारीही समोर आली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

मुलाच्या जन्मानंतर आई आणि वडील दोघांनाही मुलाची काळजी घेण्यासाठी सुट्टी मिळणं गरजेचं असतं. पण भारतात आई आणि वडिलांना मिळणाऱ्या सुट्टीमध्ये मोठी तफावत असल्याचं एका नव्या अहवालातून समोर आलंय. या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ग्लोबल हायरिंग आणि पेरोल प्लॅटफॉर्म Deel या कंपनीने हा अहवाल प्रसिद्ध केलाय.

या अहवालानुसार, भारतात बाळंतपणाची रजा संपल्यानंतर सहा महिन्यांच्या आत 25 टक्के महिला नोकरी सोडतात. तर पुरुषांमध्ये हे प्रमाण 20 टक्के आहे. एकंदरीत जगभरातील आकडेवारी पाहिली तर हे प्रमाण भारतापेक्षा जास्त आहे. जगभरात 30 टक्के महिला आणि 23 टक्के पुरुष रजा संपल्यानंतर सहा महिन्यांच्या आत नोकरी सोडतात.

आईला 130 दिवसांची रजा, तर वडिलांना फक्त 7 दिवस

भारतात आईला सरासरी 130 कामकाजाचे दिवस म्हणजेच जवळपास 26 आठवड्यांची रजा मिळते. तर वडिलांना सरासरी फक्त 7 दिवसांची सुट्टी मिळते. आई आणि वडिलांच्या रजेतील या फरकाच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. या यादीत ब्रिटन पहिल्या क्रमांकावर आहे. त्याठिकाणी आई आणि वडिलांच्या रजेतील अंतर 19.5 पट आहे. तर भारतात हे अंतर 18.6 पट आहे.

Deel च्या 'Generous Government Parental Leave Policies Don't Guarantee Gender Equality' या अहवालात 12 प्रमुख देशांमधील जवळपास 5 हजार आई-वडिलांच्या माहितीचा अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासातून एक महत्त्वाची बाब समोर आलीये. अनेक देशांमध्ये आई-वडिलांसाठी रजेचे नियम कागदावर चांगले आणि समान दिसतात. पण प्रत्यक्षात या रजेचा फायदा महिला आणि पुरुषांना समान प्रमाणात मिळत नाही.

वडिलांच्या सुट्टीचा निर्णय कंपन्यांवर अवलंबून

भारतात वडिलांना मुलाच्या जन्मानंतर किती दिवसांची रजा द्यायची हे प्रामुख्याने कंपनी ठरवते. कारण वडिलांना पालकत्वाची रजा देण्याबाबत कोणताही बंधनकारक कायदा नाही. त्यामुळे या अभ्यासात समावेश असलेल्या 12 देशांमध्ये भारतीय वडील सर्वात कमी दिवसांची रजा घेतात.

इतर देशांमधील आकडेवारी पाहिली तर ब्रिटन आणि इटलीमध्ये वडील सरासरी 10 दिवसांची रजा घेतात. कॅनडा आणि अमेरिकेत हे प्रमाण 28 दिवस आहे. तर स्वीडनमध्ये 67 दिवस आणि स्पेनमध्ये 70 दिवसांची रजा घेतली जाते. म्हणजेच अमेरिकेतील वडील भारतीय वडिलांच्या तुलनेत चार पट जास्त दिवस सुट्टी घेतात.

भारतात 98.7 टक्के महिला एकाच वेळी घेतात रजा

भारतात महिलांना सरासरी 130 कामकाजाच्या दिवसांची रजा मिळते. ही रजा सरकारच्या मातृत्व लाभ कायद्यानुसार मिळणाऱ्या 26 आठवड्यांच्या रजेइतकी आहे. अहवालानुसार, भारतातील 98.7 टक्के महिला आपली संपूर्ण रजा एकाच वेळी घेतात. 12 देशांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. तर 80.1 टक्के पुरुषही आपली रजा एकाच वेळी घेतात.

मोठ्या कंपन्यांमध्ये महिलांना जास्त रजा

महिलांना किती दिवसांची रजा मिळते हे त्यांच्या कंपनीवरही अवलंबून असल्याचं या अभ्यासात दिसून आलंय. मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांना छोट्या कंपन्यांमधील महिलांच्या तुलनेत सरासरी 80 दिवस जास्त रजा मिळते. हा फरक वेगवेगळ्या देशांमध्ये, लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीनुसार तसेच रजेच्या नियमांनुसारही दिसून येतो.

जगभरात बाळंतपणाच्या रजेचा आर्थिक फटका महिलांनाच अधिक बसतो. ब्रिटनमध्ये चार महिन्यांपेक्षा जास्त काळ रजेवर राहणाऱ्या महिलांचा हातात येणारा पगार त्यांच्या नेहमीच्या पगाराच्या निम्म्यापेक्षाही कमी होतो.

पगारातील अंतर

मुलाचा जन्म झाल्यानंतर महिला आणि पुरुषांच्या पगारातील फरक वाढू लागतो. हा फरक अनेक वर्षे कायम राहतो. अर्थशास्त्रात या परिस्थितीला 'चाइल्ड पेनल्टी' असं म्हटलं जातं. विविध क्षेत्रांमध्ये, नोकऱ्यांमध्ये आणि देशांमध्येही याचा परिणाम दिसून येतो. पालकत्वाच्या रजेतील असमानता हे या आर्थिक फरकाचं सुरुवातीचं एक कारण असल्याचं अहवालात म्हटलंय.

काही अभ्यासांनुसार, वडिलांनी मुलाच्या संगोपनासाठी जास्त दिवसांची रजा घेतली तर पुढील काळात आईचं उत्पन्न वाढण्यास मदत होऊ शकते.

12 देशांमधील पालकांच्या माहितीचा अभ्यास

या अहवालासाठी ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, सिंगापूर, स्पेन, स्वीडन, नेदरलँड्स, ब्रिटन आणि अमेरिका या 12 देशांचा अभ्यास करण्यात आला. पण या अभ्यासातील आकडे Deel या प्लॅटफॉर्मशी जोडलेल्या कर्मचाऱ्यांवर आधारित आहेत. त्यामुळे या आकडेवारीत ऑफिसमध्ये काम करणाऱ्या म्हणजेच व्हाइट कॉलर कर्मचाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वसईच्या सातिवली परिसरात कंपनीला भीषण आग; आगीचे मोठे लोळ, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

राजकारणात मोठी खळबळ! अजितदादांच्या घातपातात तटकरेंचा हात आहे का? सत्ताधारी नेत्यानं केली चौकशीची मागणी

Bank Holidays November : १० आणि ११ नोव्हेंबरला बँका बंद! तुमच्या शहराचं नाव यादीत आहे का?

Diwali Firecrackers : दिवाळीचे फटाके ठरले जीवघेणे! 6 जणांच्या डोळ्यांतून रक्तस्राव, 2 जण गंभीर

पाकिस्तानात लोकप्रिय न्यूज अँकरचा संशयास्पद मृत्यू; पती पोलिसांच्या ताब्यात, पत्रकार जगतात शोककळा

SCROLL FOR NEXT