रक्षाबंधन म्हणजे केवळ भावाच्या हातावर राखी बांधण्याचा, भावाला गोड खाऊ घालण्याचा आणि भेटवस्तू देण्याचा दिवस नाही. हे नातं असतं आयुष्यभर एकमेकांच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभं राहण्याचं… गरज पडली तर स्वतःचं सर्वस्व देऊन आपल्या माणसाला वाचवण्याचं. गुजरातमधील जल्पा शाह आणि तिचा भाऊ जितिन यांची कहाणी याच भावनिक नात्याचं जिवंत उदाहरण आहे.
बहिणीचा जीव वाचवण्यासाठी जितिनने स्वतःच्या शरीराचा एक भाग दान करण्याचा निर्णय घेतला. मात्र, डॉक्टरांनी सुरुवातीला त्याचं लिव्हर दान करण्यास नकार दिला. पण बहिणीला वाचवण्याच्या जिद्दीपुढे त्याने हार मानली नाही. अवघ्या दीड महिन्यात तब्बल १२ किलो वजन कमी करून त्याने स्वतःला शस्त्रक्रियेसाठी तयार केलं आणि अखेर आपल्या बहिणीला जीवनदान दिलं.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील मोडासामधील ३८ वर्षीय जल्पा शाह यांना याच वर्षी जानेवारीमध्ये टायफॉइड आणि कावीळ झाली होती. उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अनेक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्यांमध्ये जल्पा यांना लिव्हर सिरोसिसच्या तिसऱ्या स्टेजचं निदान झालं. औषधोपचारांचा अपेक्षित परिणाम होत नसल्याने डॉक्टरांनी त्यांचा जीव वाचवण्यासाठी लिव्हर ट्रान्सप्लांटचा सल्ला दिला. त्यावेळी जल्पाचा धाकटा भाऊ जितिन शाह बहिणीसाठी लिव्हर दान करण्यासाठी पुढे आला.
मात्र तपासणीनंतर जितिनचं लिव्हर दान करण्यासाठी योग्य नसल्याचं समोर आलं. त्याला फॅटी लिव्हरची समस्या होती. त्याच्या रिपोर्टमध्ये रक्तदाब वाढलेला असल्याचंही दिसून आलं. पण इतर कोणतीही मोठी गुंतागुंत नव्हती. जल्पाचे पती तेजस शाह यांनी TOIला सांगितलं की, डॉक्टरांनी जितिनच्या मदतीच्या भावनेचं कौतुक केलं. पण त्याचं वजन जास्त असल्याचं सांगितलं. लिव्हर दान करण्यासाठी ठराविक वजन असणं आवश्यक होतं. त्यामुळे जितिनला आधी काही किलो वजन कमी करण्याचा सल्ला देण्यात आला.
जितिनने हे आव्हान म्हणून स्वीकारलं. त्याने जिममध्ये जाण्यास सुरुवात केली आणि त्यासोबतच काटेकोर डाएटही केला. अवघ्या दीड महिन्यात त्याने तब्बल १२ किलो वजन कमी केलं. त्यानंतर केलेल्या तपासण्यांचे रिपोर्ट फारच चांगले आले आणि जितिन बहिणीसाठी लिव्हरचा काही भाग दान करण्यास पात्र ठरला.
अखेर २५ जून रोजी अहमदाबादमध्ये जल्पाचं लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यात आलं. जितिनने आपल्या लिव्हरचा काही भाग बहिणीला दान केला. ट्रान्सप्लांटनंतर दोन महिन्यांनी जल्पा आणि जितिन दोघेही सामान्य आयुष्य जगतायत. यंदाचं रक्षाबंधन त्यांच्यासाठी त्यामुळे आणखी खास ठरणार आहे. यावेळी बहिणीच्या हातावर बांधली जाणारी राखी आणि भावाला दिली जाणारी मिठाई यापेक्षा मोठी भेट त्यांच्या नात्याने आधीच एकमेकांना दिली आहे, ती म्हणजे आयुष्याची.
जल्पाचे पती तेजस शाह जितिनला देवाने पाठवलेली एक व्यक्ती मानतात. ते म्हणाले की, कॅडेव्हर म्हणजेच मृत व्यक्तीकडून अवयवदानासाठी मोठी प्रतीक्षा यादी असते. जल्पाची प्रकृती गंभीर असल्याने इतकी प्रतीक्षा करणं तिच्यासाठी धोकादायक ठरू शकत होतं. भाऊ असल्याने जितिनचा लिव्हर योग्य जुळत होतं. त्यामुळे त्याने पुढाकार घेतल्याबद्दल संपूर्ण कुटुंब त्याचं आयुष्यभर ऋणी राहील.
अहमदाबादमधील अपोलो हॉस्पिटलमध्ये हे ट्रान्सप्लांट करणारे लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. चिराग देसाई यांनी सांगितलं की, जल्पा यांना दुर्मिळ प्रकारचा ऑटोइम्यून हेपेटायटिस हा आजार आहे. आतापर्यंत पुरुषांना महिलांकडून अवयवदान होण्याचं प्रमाण मोठं आहे. मात्र आता ही परिस्थिती हळूहळू बदलताना दिसतेय.
गुजरातमधील किडनी आणि लिव्हरच्या आजारांसाठी असलेल्या सर्वात मोठ्या सरकारी वैद्यकीय केंद्रांपैकी एक असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ किडनी डिसीजेस अँड रिसर्च सेंटर (IKDRC) मधील गेल्या पाच वर्षांच्या आकडेवारीनुसार, ४५ बहिणींनी आपल्या भावांना अवयवदान केलं आहे. याउलट केवळ ८ भावांनी आपल्या बहिणींना अवयवदान केलं. म्हणजेच हे प्रमाण साधारण १:५ इतकं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.