समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आलमबदी आझमी यांचे निधन
निजामाबाद विधानसभा मतदार संघातून ते ५ वेळा आमदार राहिले होते
अखिलेश यादव यांनी आलमबदी आझमींना श्रद्धांजली वाहिली
उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीला मोठा धक्का बसला. निजामाबाद विधानसभा मतदार संघातून ५ वेळा आमदार राहिलेले समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेता आलमबदी आजमी यांचे निधन झाले. आजमगढमधील रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आलमबदी आजमी यांच्या निधनाचे वृत्त कळताच राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांचे समर्थक, कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली आहे.
समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही आलमबदी आझमी यांच्या निधनाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत शोक व्यक्त केला. अखिलेश यादव यांनी एक्सवर पोस्ट केली यामध्ये त्यांनी असे लिहिले की, 'समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आझमगडच्या निझामाबाद विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, जनाब आलमबदी साहिब यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो. भावपूर्ण श्रद्धांजली!'
आलमबदी आझमी यांचा जन्म १९३६ साली झाला होता. ते मूळचे आझमगड जिल्ह्यातील बिंदवाल, जयराजपूर येथे राहणारे होते. याच शहराचाच एक भाग असलेल्या मताबगंज येथील त्यांच्या निवासस्थानी कुटुंबासह राहत होते. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर आलमबडी आझमी यांनी गोरखपूरमध्ये नोकरी केली होती. पण महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी समाजसेवा आणि राजकारणाचा मार्ग स्वीकारला होता. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सामाजिक कार्य केली आहेत.
आलमबदी आझमी यांनी १९९६ मध्ये समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निझामाबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि पहिल्याच निवडणुकीत ते विजयी झाले होते. आलमबदी आझमी यांनी ५ वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. उत्तर प्रदेशमधील दिग्गज राजकीय नेते म्हणून त्यांची ओळख होती.
२०१२ मध्ये जेव्हा समाजवादी पक्षाचे सरकार स्थापन झाले होते तेव्हा आलमबदी आझमी यांना मंत्रीपदाची ऑफर मिळाली होती पण त्यांनी ती नाकारली होती. आपल्या मतदारसंघातील लोकांमध्ये राहून त्यांची सेवा करण्याची इच्छा असल्याचे कारण त्यांनी तेव्हा सांगितले होते. याच विचारसरणी आणि दृष्टिकोनामुळे ते सामान्य राजकारण्यांपेक्षा वेगळे स्थान मिळवू शकले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.