Thane Nashik Highway News: ठाणे -नाशिक महामार्गावर पडघ्यापर्यंत वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी आठ पदरी रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच लहान वाहनांना रस्ता मिळावा, यासाठी अवजड वाहने डाव्या बाजूने चालविण्यासंदर्भात सूचना देण्याचे निर्देश दिले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. तसेच या मार्गावरील खड्डे तातडीने मास्टिकने भरण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळीच ठाणे- नाशिक महामार्गावरील खारेगाव ते पडघा, खडवली फाटा या रस्त्याची पाहणी केली. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी होण्याची कारणे पाहण्यासाठी तसेच रस्त्यावरील खड्ड्यांसंदर्भात यापूर्वी मंत्रालयात मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठक घेतली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून या महामार्गाची पाहणी केली. ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत किंवा वाहतूक कोंडी होत आहे, अशा सर्व ठिकाणी त्यांनी पाहणी करून हे खड्डे तत्काळ मास्टिक पद्धतीने बुजविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग या सर्व यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी आज या मार्गाची पाहणी केली. ठाणे नाशिक महामार्गावरील पडघा पर्यंतच्या रस्त्याचे आठपदरीकरण करण्याचे काम सुरू आहे. हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे. तसेच ज्या ठिकाणी पंक्चर आहेत किंवा कट आहेत, ते बंद करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.
तसेच रस्ता ओलांडून गावात जाण्यासाठी असलेल्या ठिकाणी हाईट बॅरिअर लावून मोठी वाहने त्या ठिकाणाहून वळणार नाहीत याची दक्षता घ्यावी. रस्त्याच्या डाव्या बाजूनेच अवजड वाहने चालविण्यात यावीत, जेणेकरून लहान वाहने व रुग्णवाहिकांना एका बाजूने रस्ता मोकळा मिळेल, यासाठी वाहन चालकांना सूचना देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले आहे. मोठ्या प्रमाणात अवजड वाहने रस्त्यावर आल्यास ही वाहने थांबविण्यासाठी काही ठिकाणी तात्पुरत्या पार्किंगची सुविधा करण्यात यावी, त्या ठिकाणी वाहनचालकांसाठी शिवभोजन थाळी केंद्र सुरू करावे तसेच इतर सुविधा पुरविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राजनोली व माणकोली येथील उड्डाणपुलाखालील रस्ते व्यवस्थित करून घ्यावेत, जेणेकरून गर्दीच्या काळात या ठिकाणी अवजड वाहने थांबविता येतील. तसेच माणकोली येथील वाहतुकीस अडथळा येणारी दुकाने, गाळे तेथून हटविण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. (Latest Marathi News)
ठाणे ग्रामीण पोलीसांच्या मुख्यालयासाठी निश्चित केलेल्या सापे येथील जागेचीही पाहणी मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. तसेच काही दिवसांपूर्वी पडघ्यातील खडवली फाटा येथे अपघात झाला होता. त्या स्थळाची पाहणीही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. जीप व कंटेनरचा अपघात दुर्देवी असून असे अपघात घडू नयेत, यासाठी खबरदारी घेण्यात यावी. या ठिकाणी सेवा रस्ता (Service Road) तातडीने करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिली. भिवंडी येथे आरोग्य उपकेंद्र उभारण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून आरोग्य विभागाकडून त्यासाठी निधी देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.