मुंबई : एकनाथ शिंदे सरकारने काल विधानसभेत बहुमत चाचणी जिंकली. या बहुमत चाचणीनंतर सभागृहात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह विरोधीपक्षनेते आणि अन्य नेत्यांची भाषणं झाली. कालचा पुर्ण दिवस सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांच्या भाषणांमुळे चांगलाच रंगला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणामध्ये अनेक किस्से सांगितले या भाषणामध्ये प्रामुख्याने त्यांनी आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे (Anand Dighe and Balasaheb Thackeray) यांच्या आठवणींना उजाळा दिला.
दरम्यान, या कालच्या सर्व घडामोंडीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या पत्रकार परिषदेतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उत्तर देत असतानाच त्यांच्यासमोरचा माईक देवेंद्र फडणवीस (Ddevendra Fadnavis) यांनी ओढून घेतल्यामुळे हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या घटनेचा व्हिडीओ प्रंचड प्रमाणात व्हायरल (Viral Video) होत असून या व्हिडीओमुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना ट्रोल केलं जात आहे. अशातच आता काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी देखील हा व्हिडीओ ट्विट करत मुख्यमंत्री कौन? असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्र्यांना डिवचलं आहे.
काल सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे नेते संतोष बांगर कोणत्या पक्षातून तुमच्या गटात आले आहेत? असा प्रश्न विचारला असता शिंदे म्हणाले, 'कुठल्या म्हणजे? शिवसेनेतून आलेत ना' त्याचं हे उत्तर पूर्ण होण्याआधीच त्यांच्या शेजारी बसलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडून माईक ओढून घेत म्हणाले, 'ते शिवसेनेतून खऱ्या शिवसेनेत आले आहेत. आतापर्यंत ते चुकीच्या गटात होते.' असं उत्तर फडणवीसांनी दिलं आणि उत्तर दिल्यानंतर त्यांनी माईक पुन्हा शिंदेंकडे दिला.
पाहा व्हिडीओ -
मात्र ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे आता या सरकारमध्ये कोणाचं वर्चस्व असणार हे स्पष्ट झालं आहे. अशा आशयाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच व्हिडीओचा आधार घेत लोंढे यांनी देखील नवनिर्वाचित सरकारला डिवचण्याचा प्रयत्न केला.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.