Pune Municipal Corporation encroachment drive : डोळ्यावर काळा गॉगल, हातात मोबाईल, टाइट इन आणि कडक वॉक मध्ये वागत पुणे शहरातील अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांचा कारवाई दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला आहे. पुण्यातील कर्वेनगर भागात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने २ दिवसांपूर्वी कारवाई केली. यावेळी बुलडोझर लावून ज्या आस्थापनांनी अतिक्रमण केले आहे यावर पालिकेने धडक कारवाई केली. कर्वेनगर भागातील काही दुकानं, उपाहारगृह, फळांचे विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान, पालिकेच्याच कर्मचाऱ्यांनी एक व्हिडिओ तयार केला, त्याला इफेक्ट दिले तसेच एक संगीत लावून थेट सोशल मीडियावर पोस्ट केला.
या व्हिडिओ ची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे याचं कारण म्हणजे या व्हिडिओ मध्ये असलेला कर्मचारी यांच्याभोवती हा व्हिडिओ फिरताना दिसतोय. त्यात विशेष म्हणजे एक अधिकारी कर्मचारी व्हिडिओच्या प्रत्येक फ्रेम मध्ये दिसतोय. गळ्यात पालिकेचे ओळखपत्र आहे पण असं असताना सुद्धा आपला व्हिडिओ तयार होत असल्याने संबंधित अधिकारी, कर्मचारी एकदम "टाईट" उभे आहेत. त्यामुळे या व्हिडिओमुळे पालिकेची कारवाई कमी आणि शो-बाजी जास्त सुरू आहे का आणि हा पालिकेतील रिल स्टार आहे तरी कोण अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या व्हिडिओ वर सुद्धा नागरिकांनी कमेंट्स नोंदवल्या आहेत.
पुणे महापालिकेच्या वतीने सध्या संपूर्ण शहरात अतिक्रमण करणाऱ्या आस्थापनानांवर जोरदार कारवाई सुरू आहे. फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, जंगली महाराज रस्ता, महात्मा गांधी रस्ता अशा रस्त्यांवर दुकानं थाटलेल्या विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम तसेच पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी संयुक्त पत्रकार परिषद घेत शहरातील "ऍक्शन प्लॅन" बद्दल सांगितला. वरिष्ठांच्या आदेशानंतर सर्वत्र अतिक्रमण विभागाकडून अगदी छोट्या पासून मोठ्या दुकानांवर सध्या कारवाई सुरू आहे.
अशीच एक कारवाई पुण्यातील कर्वेनगर भागात अतिक्रमण विभागाने दोन दिवसांपूर्वी केली. या कारवाई मध्ये कर्वेनगर मधील अनेक दुकानांवर बुलडोझर चालवला गेला. दुकानांची फ्रंट मर्जिन, दुकानाच्या बाहेर लावलेले छत आणि कॅनोपी असे सगळे काढून टाकण्यात आले. दरम्यान, हे सगळं सुरू असताना अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या पथकातील एक जण हा फक्त व्हिडिसोसाठी नेमला होता की काय असा प्रश्न या कारवाई नंतर उपस्थित करण्यात आला. याचं कारण संबंधित कारवाई सुरू नंतर पुणे महापालिकेच्या सोशल मिडिया हॅण्डल वरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला ज्याला इफेक्ट आणि संगीत सुद्धा लावण्यात आलं. दृश्यांमध्ये मध्ये संबंधित कर्मचारी हा कारवाई कमी आणि व्हिडिओ मध्ये अप्रत्यक्षपणे सहभागी होण्यासाठी दिसत आहे. या व्हिडीओवर नागरिकांनी सुद्धा जोरदार शेरेबाजी केली आहे. कारवाई १० टक्के आणि शोबाजी ९० टक्के, कारवाई फक्त रिलसाठी अशा कमेंट्स नागरिकांनी केल्या आहेत. त्यामुळे संबंधित रिलस्टार कर्मचारी आणि त्याच्या इतर सदस्यांवर महापालिका आयुक्त काही कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.