ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांनी बंड केल्यानंतर आता शिवसेनेला (Shivsena) एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. सुरूवातीला आमदार त्यानंतर नगरसेवक आणि आता थेट शिवसेनेचे पदाधिकारी शिंदे गटात सामील होत असल्याने शिवसेनेत फुट पडल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे आपल्याच नेतृत्वात असलेली खरी शिवसेना आहे असा दावा करत आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्याकडून सुद्धा आपलाच गट खरी शिवसेना असल्याचा दावा केला जातो आहे. (Ekanath Shinde Latest News)
विशेष म्हणजे शिंदे गटाला राज्यभरातून चांगली साथ मिळत आहे. रूवारी उल्हासनगरात शिवसैनिकांचा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्याला शिवसेनेचे कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख माजी आमदार सुभाष भोईर उपस्थित होते. तर उल्हासनगरमधील शिवसैनिकांनी या मेळाव्याला प्रचंड गर्दी केली होती. या मेळाव्याच्या बॅनरवर असलेले गोपाळ लांडगे हे मेळावा सुरू असतानाच शिंदे गटात सामील झाल्यानं खळबळ उडाली आहे.
गोपाळ लांडगे हे कल्याणचे शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहत होते. त्यांनी आपल्या पदाचा त्याग करत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण प्रमाण मानून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
कल्याण डोंबिवलीचे माजी नगरसेवक राजेश मोरे, माजी नगरसेवक विशाल पावशे, माजी नगरसेवक प्रशांत काळे यांनी देखील यापूर्वीच मुख्यमंत्री शिंदे यांना आपला पाठींबा दर्शवला आहे. कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेले गोपाळ लांडगे यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांना पाठींबा दिल्याने कल्याण डोंबिवलीमधील शिंदे गटाची ताकद वाढली आहे. (Thane Shivsena News)
शिवसेनेत झालेल्या अंतर्गत बंडाळीनंतर प्रत्येक ठिकाणी शिवसेनेत उघडपणे २ गट पडले आहेत. यापैकी मूळ शिवसैनिकांच्या गटाने उल्हासनगर शहरात आज निर्धार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला शिवसेनेचे कल्याण लोकसभा क्षेत्र संपर्कप्रमुख माजी आमदार सुभाष भोईर यांच्यासह उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, ज्येष्ठ नगरसेवक धनंजय बोडारे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या मेळाव्यात पक्ष सोडून वेगळा गट स्थापन केलेल्या शिवसेनिकांवर टीका करण्यात आली. तसंच उपस्थित शिवसैनिकांना एकनिष्ठतेची शपथही देण्यात आली. तर हे सगळं सुरू असतानाच शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे हे शिंदे गटात सामील झाले. यावेळी ज्या शिवसैनिकांनी शिवसेना वाढवण्यासाठी रक्ताचं पाणी केलं त्यांचंच, पोलीस संरक्षण काढणं आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणं हा रडीचा डाव असल्याची टीका यावेळी संपर्कप्रमुख सुभाष भोईर यांनी केली.
तर आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक असून अशा कितीही केसेस अंगावर घ्यायला तयार आहोत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे उल्हासनगर शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली आहे.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.