Thane Elections: महापौरांनाचा बसणार प्रभाग रचनेचा फटका? - Saam TV
मुंबई/पुणे

Thane Elections: महापौरांनाचा बसणार प्रभाग रचनेचा फटका?

Amit Golwalkar

ठाणे : ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रभाग रचनेवरून सध्या शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये टोकाचे वाद निर्माण झाले आहेत. या वादात आघाडीवर असलेल्या महापौरांनाच या प्रभाग रचनेचा पहिला फटका बसण्याची शक्यता आहे. (Thane Mayor in soup due to ward restructuring)

सलग दोन वेळा निवडून आल्यानंतर हॅट् ट्रिकच्या तयारीत महापौर नरेश म्हस्के असताना त्यांचा आनंदनगर प्रभाग अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला आहे. त्यात या ठिकाणी दोन महिला नगरसेविकांचे आरक्षण पडल्यास त्यांना निवडून येण्यासाठी दुसरा प्रभाग शोधावा लागणार आहे. तशी वेळ ओढावू नये यासाठी आरक्षण (Reservation) रद्द करण्यासाठी त्यांची धावाधाव सुरू झाली आहे.

ठाणे (Thane) पालिकेच्या निवडणुकीसाठी १ फेब्रुवारीला प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाली. तीन सदस्य प्रभाग पद्धतीने होणाऱ्या या निवडणुकीत १४२ सदस्य निवडून येणार आहेत. त्यात ७२ जागा या महिलांसाठी राखीव आहेत. या नवीन रचनेमुळे सध्या अस्तित्वात असलेल्या चार जणांच्या पॅनलपैकी एका नगरसेवकाचे ‘स्थलांतर’ होणार हे निश्चित आहे. त्यात ओबीसी आरक्षणाचे घोंगडे भिजत असले तरी महिला आरक्षण आणि अनुसूचित जाती, जमातीसाठीही जागा आरक्षित होणार असल्याने त्याचाही फटका विद्यमान नगरसेवकांना बसण्याची शक्यता आहे. यामध्ये पहिला क्रमांक ठाण्याचे प्रथम नागरिक तथा महापौर नरेश म्हस्के यांचा लागण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दृष्टिक्षेप
पालिका हद्दीची एकूण लोकसंख्या १८ लाख ४१ हजार ४८८
अनुसूचित जातीच्या नागरिकांची संख्या एक लाख २६ हजार तीन
अनुसूचित जातीकरिता राखीव प्रभाग - ३, १०, १२, १५, २३, २४, २७, २९, ३४, ४५

...अशी गोची होणार
नवीन प्रभाग रचनेनुसार आनंदनगर, मनोरुग्णलय, रघुनाथ नगर, काशीस पार्क गांधीनगर, सिद्धिविनायक नगर हा महापौर नरेश म्हस्के यांचा सध्याचा १९ क्रमांकाचा प्रभाग नवीन २७ क्रमांकाचा झाला आहे. या प्रभागाची लोकसंख्या ३५ हजार १५० इतकी असून या प्रभागात अनुसूचित जातीच्या नागरिकांची संख्या तीन हजार ५२८ इतकी आहे. त्याची टक्केवारी १०.४ इतकी आहे. त्यामुळे हा प्रभाग अनुसूचित जातीसाठी जवळपास राखीव झाला आहे. महापौर खुल्या गटातून निवडणूक लढवण्यास पात्र आहेत. पण जागेच्या सोडतीत खुल्या गटातील दोन महिलांना लॉटरी लागली, तर महापौरांची गोची होणार आहे.

चार हजार लोकसंख्येची जमवाजमव!
आपला प्रभाग सुरक्षित करण्यासाठी सध्या महापौर नरेश म्हस्के यांची धावपळ सुरू असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यांच्या प्रभागाची लोकसंख्या चार हजाराने वाढली, तर अनुसूचित जातीच्या नागरिकांची टक्केवारी कमी होऊन हे आरक्षण इतर प्रभागात जाईल. त्यासाठी त्यांचा तसा प्रयत्न सुरू आहे. शिवसेनेतील ज्येष्ठ नगरसेवकही हे कार्य सिद्धीस नेण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावत आहेत. असे असले तरी आपल्या सुरक्षित प्रभागातील लोकसंख्या महापौरांच्या झोळीत टाकण्यासही शिवसेनेचे पदाधिकारी तयार नसल्याचे समजते. त्यामुळे आता वरिष्ठ पातळीवरून या प्रभागातील आरक्षण इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आपला प्रभाग सुरक्षित करण्यासाठीच नवीन प्रभाग रचनेला महापौरांकडून विरोध होत असल्याची टीका विरोधक करत आहेत.

उपमहापौर सुरक्षित
अनुसूचित जमातीसाठी प्रभाग क्र. ५, ६ आणि २९ हे आरक्षित झाले आहेत. उपमहापौर पल्लवी कदम यांचा चेंदनी खारटन रोड या २९ क्रमांकाच्या प्रभागात अनुसूचित जाती आणि जमाती अशा दोन्ही जागा राखीव झाल्या आहेत. येथे फक्त एकच जागा खुल्या वर्गासाठी राहणार असली, तरी तेथून निवडणूक लढवण्याचा मार्ग उपमहापौर पल्लवी कदम यांच्यासाठी खुला राहणार आहे. या प्रभागातून निवडणूक लढवण्यास उपमहापौरांचे पतीही इच्छुक आहेत. पण शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेवकांचे पुनर्वसन करायचे असल्याने त्यांची ही संधी हुकणार असल्याचे दिसते.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

PM Vishwakarma Yojana: वर्षभरात ६ लाख लाभार्थी, २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी केलेय रजिस्ट्रेशन, योजनेचा कसा घ्याल लाभ?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

CIDCO Lottery 2024: गुड न्यूज! म्हाडापाठोपाठ सिडकोच्या घरांच्या किमती १० टक्क्यांनी कमी होणार?

SCROLL FOR NEXT