वसई-विरारच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. एकेकाळी या साम्राज्याचे एकछत्री अंमलदार असलेले हितेंद्र ठाकूर आणि त्यांची बहुजन विकास आघाडी (बविआ) सध्या अस्तित्वाच्या लढाईला सामोरे जात आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर, आता महापालिकेवरील आपली सत्ता टिकवण्यासाठी ठाकूर यांनी सर्वस्व पणाला लावले आहे. मात्र, या सत्तासंघर्षात त्यांनी घेतलेली धनंजय गावडे यांची साथ सध्या चर्चेचा आणि वादाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने आता वसई-विरार महापालिकेतून ठाकूर यांची 'बविआ' उखडून टाकण्याचा चंग बांधला आहे. गेल्या अनेक दशकांपासून असलेल्या या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी भाजप रणनीती आखत आहे. विधानसभा निवडणुकीतील विजयाने भाजपचा आत्मविश्वास वाढला असून, महापालिकेत परिवर्तन घडवण्यासाठी पक्षाने कंबर कसली आहे.
आपल्या बालेकिल्ल्याला पडलेले खिंडार रोखण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. महापालिका वाचवण्यासाठी त्यांनी शिवसेनेचे माजी नेते धनंजय गावडे यांना सोबत घेतले आहे. गावडे आणि ठाकूर यांची ही युती राजकीय वर्तुळात खळबळ माजवणारी ठरली आहे.
एकीकडे भाजप 'भ्रष्टाचारमुक्त आणि गुन्हेगारीमुक्त' वसई-विरारचा नारा देत असताना, दुसरीकडे ठाकूर यांनी गावडे सारख्या वादग्रस्त नेत्याला सोबत घेऊन आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे बसलेला धक्का एवढा मोठा आहे की, आता आपला गड वाचवण्यासाठी ठाकूर कोणत्याही थराला जाण्यास तयार असल्याचे या युतीवरून दिसून येते.
वसई-विरार महापालिकेची आगामी निवडणूक ही केवळ विकासकामांवर आधारित न राहता, ती आता 'वर्चस्व विरुद्ध परिवर्तन' अशा वळणावर येऊन ठेपली आहे. धनंजय गावडे यांच्या रूपाने मिळालेली साथ ठाकूर यांना तारणार की त्यांच्या राजकीय अधोगतीला कारणीभूत ठरणार, हे येणारा काळच ठरेल. मात्र, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यांच्या युतीमुळे वसई-विरारच्या राजकारणातील गुन्हेगारीकरण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.