Mumbai News: बारसूची (Barsu Refinery Project) जागा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीच सुचवली होती. यासंदर्भात त्यांनी मोदींना पत्र पाठवले होते. असा दावा करणाऱ्या राज्याच्या उद्योगमंत्री उदय सामंत यांचा ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. यावेळी बारसूवरुन त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'हिंमत असेल तर समोर या, असे सुपाऱ्या देऊन आमच्यावर हल्ले करु नका.', अशी टीका यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'कुठला तरी सरकारी कागद फडकवत उदय सामंत यांनी शहाणपणा करु नये. जागेवर जावे आणि लोकांशी बोलावे.', असा टोला त्यांनी उदय सामंत यांना लगावला आहे.
'बारसूबाबत शिवसेनेची अजिबात दुटप्पीपणाची भूमिका नाही. नाणारला पर्यायी जागा सूचवण्यासंदर्भात एक भूमिका घेतली होती. प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाऊ नये हीच आम्ही भूमिका घेतली होती.' असे संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.
संजय राऊत यांनी पुढे सांगितले की, 'आम्ही उद्योगाचे शत्रू नाही. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन करताना सांगितले होते की उद्योग राहिला पाहिजे रोजगार वाढला पाहिजे आणि या रोजगारात भूमिपुत्रांना स्थान मिळाले पाहिजे. उद्योग जगला तरच कामगार जगेल. उद्योग आला तर रोजगार वाढेल.' यावेळी 'एअरबस महाराष्ट्रबाहेर का गेला?, फॉक्सकॉन-वेदांत बाहेर का गेला? याचे उत्तर सरकारने द्यावे.', असे देखील त्यांनी सांगितले.
सरकारवर हल्लाबोल करताना संजय राऊत यांनी सांगितले की, 'सुपाऱ्या घेऊन बोलू नका. महाराष्ट्रात शिवसेनेला सुपारी घेण्याची गरज पडली नाही. महाराष्ट्रात शिवसेना संपवण्याची आणि फोडण्याची सुपारी कोण घेत आहे. इलेक्शन कमिशनपासून ते न्यायव्यवस्था आणि केंद्रीय तपास यंत्रणेपर्यंत कोण सुपाऱ्या देत आहे. सुपाऱ्या घेऊन कोण काम करत आहेत. हिंमत असेल तर समोर या, असे सुपाऱ्या देऊन आमच्यावर हल्ले करु नका.' अशी टीका त्यांनी केली.
'अशाप्रकारे तुम्ही आमच्या अंगावर येणार असाल तर लक्षात ठेवा. कागदावर तुम्ही शिवसेना ट्रान्सफर केली. तर त्या कागदालाही आता वाळवी लागली असेल. तीन दिवसांपासून रजेवर गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी एखाद्या कुठल्या यज्ञात तो कागद टाकला आहे का हे चेक करा.' असा टोला त्यांनी लगावला आहे.
तसंच, 'लोकं आमच्याबरोबर आहे. आम्ही तुमच्याशी लढू याचीच तुम्हाला भीती आहे. कोकणची लोकं आमच्या पाठिशी आहेत आणि आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत. बारसूतल्या स्थानिक भूमिपुत्रांना जर हा जहरी प्रकल्प नको असेल. जर ते मरायला तयार असतील तर शिवसेना त्यांना मरु देणार नाही. पहिली गोळी शिवसेनेच्या छातीवर जाईल.' असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.