मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या टीकेला ठाकारे गटाने 'सामना' अग्रलेखातून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मिंध्यांना धनुष्यबाणाचे चिन्ह मिळाले ते याच अमित शहांच्या मेहेरबानीने हे काय आता लपून राहिले? हा माणूस महाराष्ट्र व मराठी माणसाचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे, असं म्हणत ठाकरे गटाने भाजपवर जोरदार आगपाखड केली आहे. (Latest Marathi News)
ठाकरे गटाने 'सामना'तून अमित शहा आणि भाजपवर जोरादार टीकास्त्र सोडलं आहे. ठाकरे गटाने अग्रलेखात म्हटले आहे की, ' शिवसेना' हे नाव व चिन्ह विकत घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाची कमळी पायातले घुंगरू तुटेपर्यंत नाचत आहे. मिंधे गटापेक्षा भारतीय जनता पक्षालाच आनंदाचे भरते आले आहे. एखाद्या दुकानातून चणे, शेंगदाणे विकत घ्यावेत, अशा पद्धतीने शिवसेना हे नाव आणि चिन्हाबाबतचा ‘निकाल' विकत घेतला हे आता लपून राहिलेले नाही'.
'अमित शहा मराठी माणसांचे शत्रू'
'मिंध्यांना धनुष्यबाणाचे चिन्ह मिळाले ते याच अमित शहांच्या (Amit Shah) मेहेरबानीने हे काय आता लपून राहिले? हा माणूस महाराष्ट्र व मराठी माणसाचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे. त्यामुळे श्रीमान शहांच्या कच्छपी लागून जे स्वतःचा राजकीय कंडू शमवीत आहेत, त्या सगळयांना महाराष्ट्राचे दुष्मन मानावे लागेल, असा घणाघात ठाकरे गटाने केला.
'लाखो शिवसैनिकांनी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या (Election Commission) पुढयात प्रतिज्ञापत्रे पाठवली, त्यांना किंमत नाही? शिवसेनेचे पदाधिकारी, जिल्हाप्रमुख, उपनेते यांच्या प्रतिज्ञापत्रांना मोल नाही? शिवसैनिकांनी ज्यांना निवडून आणले त्यांची मोजून धनुष्यबाण व पक्षाच्या स्वामित्वाचा निकाल देणे ही घटनेशीच बेइमानी आहे, अशी टीका ठाकरे गटाने 'सामना'तून केली.
'आमदार - खासदारांना विकत घेऊन सौदा'
'उद्या एखादा अदानी, अंबानी, नीरव मोदी उठेल व अशा प्रकारे आमदार - खासदारांना विकत घेऊन संपूर्ण नावाचा सौदा करण्यात आला. ही कसली लोकशाही? ठाकऱ्यांनी स्थापन केलेला शिवसेना हा पक्ष त्यांच्याकडून काढून घेतला व बाळासाहेब ठाकरे यांच्या देवघरात पुजला जाणारा धनुष्यबाणही चोरून दिल्लीचे तळवे की आणखी काही चाटणाऱ्यांच्या हाती ठेवला तो कोणत्या बहुमताच्या आधारावर? असा सवाल ठाकरे गटाने 'सामना'तून करण्यात आला आहे.
'मोदी युग संपले आणि बाळासाहेब ठाकरे व त्यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेशिवाय महाराष्ट्रात भाजपला कुत्रेही विचारणार नसल्यानेच त्यांनी शिवसेनेवर दरोडा टाकला व आपले तळवे चाटणाऱ्या मिंध्यांना मुख्यमंत्री केले, अशी टीका ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.