सिंहगड संस्थेच्या १० शाळांची मान्यता रद्द करण्यात येणार आहे. शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेत हे आदेश दिले आहेत. थकीत वेतनामुळे शिक्षकांनी अध्यापनावर बहिष्कार टाकला आहे. ६ माध्यमिक आणि ४ प्राथमिक शाळांचा या लिस्टमध्ये समावेश आहे. विद्यार्थ्यांचे अन्य शाळांमध्ये समायोजन करण्याचे निर्देश देखील शिक्षण विभागाने दिले आहे. शिक्षण विभागाने शाळांची मान्यता रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचे टेन्शन वाढले आहे.
सिंहगड संस्थेच्या शाळांमधील शिक्षकांचे अनेक महिन्यांपासून वेतन थकल्याने आणि शिक्षकांनी अध्यापनावर बहिष्कार टाकल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. याच पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीला मोठा दणका दिला. सिंहगड संस्थेच्या १० शाळांची मान्यता शिक्षण विभागाने रद्द केली आहे. शाळांची मान्यता रद्द करण्याचे आदेश पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक मच्छिंद्रनाथ कदम यांनी दिले आहेत. या मान्यता रद्द करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून म्हणजेच १ मे २०२७ पासून होणार आहे. त्यामुळे या सर्व शाळा तात्काळ बंद होणार नाहीत.
शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशानुसार, सिंहगड संस्थेच्या या माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या १८ महिन्यांपासून प्रलंबित आहे. वेतन मिळत नसल्यामुळे या शिक्षकांनी अध्यापनावर बहिष्कार टाकला होता. यामुळे शाळांमधील नियमित अध्यापन विस्कळीत होऊन विद्यार्थ्याचे नुकसान होत होते. प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा करूनही वेतनाचा प्रश्न मार्गी लागला नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने शाळांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला. माध्यमिक शाळा संहितेतील नियम ७.१, ७.२ आणि ७.३ नुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
१. सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, नऱ्हे.
२. सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, आंबेगाव.
३. सिंहगड पब्लिक स्कूल, खुसगाव.
४. आर. एम. डी. स्प्रिंगडेल माध्यमिक स्कूल, वारजे.
५. आर. एम. डी. स्प्रिंगडेल माध्यमिक स्कूल, कर्वेनगर-एरंडवणे.
६. सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, कोंढवा.
१. सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल, आंबेगाव
२. सिंहगड स्प्रिंगडेल पब्लिक स्कूल, वडगाव
३. सिंहगड सिटी स्कूल, कोंढवा
४. आर. एम. डी. सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल, वारजे
शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे संबंधित शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी देखील शिक्षण विभागाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. या विद्यार्थ्यांचे अन्य शाळांमध्ये समायोजन करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थ्यांच्या समायोजनाची जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी आणि शिक्षण यंत्रणेवर सोपविण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.