मराठी माणसाच्या न्याय आणि हक्कासाठी शिवसेना पक्षाची निर्मिती झाली. मात्र आता याच शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून मराठी माणसावरच अन्याय सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडील इराणीवाडी येथे राहणाऱ्या पै कुटुंबीयांच्या मालकीचे दुकान विकत घेऊन फक्त इसार म्हणून काही रक्कम देऊन उर्वरित रक्कम देण्यास शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख लालसिंग राज पुरोहित यांच्याकडून टाळाटाळ होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.
याच दुकानाच्या जागेवर आता शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख लालसिंग राज पुरोहित यांनी आपले संपर्क कार्यालय उभारले आहे. दुकानाच्या व्यवहारातील उर्वरित रक्कम पै कुटुंब राजपूत यांच्याकडे मागण्यासाठी गेले असता त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप पै कुटुंबीयांनी केला आहे. आम्हाला आमच्या दुकानाचे पैसे द्यावेत किंवा आमचे दुकान आम्हाला परत मिळवून देऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पै कुटुंबीयांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिमेकडील इराणीवाडीत राहणारे दत्ताराम हे अर्धांगवायू आजाराने ग्रस्त आहेत त्यांच्या उपचारासाठी त्यांची पत्नी सुषमा पै आणि मुलगा यांनी त्यांचे इराणीवाडी येथील दुकान फेरीसाठी काढले. त्यावेळेस लालसिंग राजपुरोहित यांनी पै कुटुंबीयांचा व्यावसायिक गाळा ५२ लाख रुपयांना विकत घेतो असे सांगून काही इसार (टोकण) रक्कम दिली. तसा करार करून दुकानाचा ताबा लालसिंग राज पुरोहित यांनी घेतला. उर्वरित पैसे दोन महिन्यात देतो त्यानंतर व्यवहार पूर्ण होईल असे ठरले.
मात्र दोन महिन्यानंतर सुषमा पै यांनी लालसिंग राजपुरोहित याच्याकडे उर्वरित पैसे आणि व्यवहार पूर्ण करण्यासाठी तगादा लावला. मात्र त्याने उडवा उडवायची उत्तर दिली. सुषमा पै यांनी पतीच्या आजारपणाबद्दल सांगून उर्वरित पैसे काढण्यासाठी प्रयत्न केले मात्र पै कुटुंबीयांना लालसिंग राज पुरोहित अरेरावीची भाषा करून धमक्या देऊ लागले आणि यापुढे तुम्हाला एकही पैसा मिळणार नाही तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हणत पुन्हा पैसे मागण्यासाठी आलात तर मुलाला जीवे मारून टाकीन अशी धमकी दिल्याचे पै कुटुंबीयांनी केलेल्या आरोपात म्हटले आहे.
यापुढे तुम्ही माझ्याकडे पैसे मागायला यायचे नाहीत. आता इथे आमच्या शिवसेना पक्षाची शाखा झाली आहे. तुम्हाला काय करायचे ते करा माझी पोहोच वरपर्यंत आहे पोलीस आणि कोणीही नेते माझे काहीच करू शकत नाही असे म्हणत पै कुटुंबीयांना घाबरवण्याचे काम विभाग प्रमुख लालसिंग राजपूत यांनी केल्याचे देखील सुषमा पै यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. शिवाय हा माणूस गुंड प्रवृत्तीचा असल्यामुळे मी आणि माझे कुटुंबीय मोठ्या दडपणात आणि दहशतीत आहोत असेही पै यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
लालसिंग राजपुरोहितपासून मला आणि माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. मी आरोपीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला परंतू तो समजवण्या पलीकडे गेलेला आहे. त्यांच्याकडून मला त्रास देणे वारंवार चालूच आहे. त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. शिवाय पोलिस प्रशासन ही माझे काहीही बिघडवू शकत नाही माझी वरपर्यंत ओळख आहे, तुला जे करायचे आहे ते कर मी तुझा बदला घेणारच असे बोलून त्याने धमकावले असल्याचे यांनी म्हटले आहे.
ज्येष्ठ नागरिक असलेले ईराणीवाडीतील रहिवासी दत्तात्रय हे २०१९ पासून अर्धांग वायू आजाराने ग्रस्त आहेत. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे. त्यांच्या उपचारासाठी पैशाची गरज असताना लालसिंग राजपुरोहित हा शिवसेना शिंदे गटाचा विभाग प्रमुख पै कुटूबीयांचे पैसे देत नाही. त्यामुळे आता लालसिंग राजपुरोहित सारख्या व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी दत्तात्रय पै यांच्या मुलाने केली आहे. मात्र पोलिस देखील दबावत आहेत त्यामुळे ते कारवाई करत नाहीत असा आरोप देखील यांच्या मुलाने केला आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला न्याय द्यावा आमचे दुकान आम्हाला द्यावे किंवा आमचे उरलेले पैसे त्याच्याकडून काढून द्यावेत असं साकडं पै कुटुंबीयांकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना घालण्यात आले आहे. पै कुटुंबीयांच्या या मागणीचा विचार होईल का आणि त्यांना न्याय मिळेल का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.