Maharashtra Political News : 'काही आमदार आणि खासदार सुद्धा आमच्या संपर्कात असून येणाऱ्या काळात कोण कुठे जातंय, आणि कोण कुणाच्या संपर्कात आहे हे कळेलच, असा मोठा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलाय. तसंच मध्यावधी निवडणुकांची वक्तव्य म्हणजे शिल्लक आमदार कुठे जाऊ नये, यासाठी सुरू केलेला टाईमपास असल्याचं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. (Latest Marathi News)
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे आज डोंबिवलीच्या काटई गावात तुळशी विवाह सोहळ्यासाठी आले होते. राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं होतं. या दाव्यावरून खासदार श्रीकांत शिंदेंनी (Shrikant Shinde) उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
'महाराष्ट्राला सध्या अतिशय स्थिर आणि स्टेबल सरकार मिळालं आहे. त्यात शिल्लक आमदार कुठे जाऊ नये, म्हणून मध्यावधी निवडणुकांचं एक खेळणं त्यांच्या हाती दिलं जात असून हा निव्वळ टाईमपास असल्याचं खासदार शिंदे म्हणाले. ही वक्तव्य प्लॅनिंग करून केली जात असल्याचा दावाही त्यांनी केला.
तसंच हे सरकार गेल्या ३ महिन्यात ज्या पद्धतीने लोकांच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतेय, ते पाहता २ वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत यांची काय परिस्थिती होईल? याचा विचार करून यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे हे मध्यावधी निवडणुकीचं भूत समोर आणलं जात आहे, अशी टीका श्रीकांत शिंदेंनी केली.
'काही आमदार आणि खासदार सुद्धा आमच्या संपर्कात असून येणाऱ्या काळात कोण कुठे जातंय आणि कोण कुणाच्या संपर्कात आहे हे कळेलच, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
'आमचा आकडा किती वाढतो, हे येणाऱ्या काळात कळेलच, सगळ्यांचे आमदार आमच्या संपर्कात असून सगळ्या गोष्टी आत्ताच सांगता येणार नाहीत, असं म्हणत थोडा धीर धरा, सबर रखो.. असं वक्तव्य खासदार श्रीकांत शिंदेंनी केलंय. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सुपुत्रानेच हे वक्तव्य केल्यानं राज्याच्या राजकारणात येत्या काळात मोठी उलथापालथ होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.