मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये कोरोना ओमिक्रॉनच्या नवीन आवृत्तीवर चर्चा होणार आहे. राज्यामध्ये १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, आता कोरोनाच्या नव्या स्वरूपाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होणार का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याविषयी निर्णय आजच्या बैठकीत होणार आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आजच्या बैठकीकडे लागले आहे.
मुंबई आणि परिसरातील पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व शाळा सुरू करण्याचा निर्णय १ डिसेंबरपासनू घेण्यात आला होता. मात्र कोरोनाच्या नव्या व्हॅरिएंटचा प्रसार जगभरात झपाट्याने पसरत असल्याने शाळा सुरू करण्याबाबतची सावध भूमिका घेतली जात आहे. याबाबत शिक्षण विभागाकडून मुंबई महापालिका आयुक्तांना प्रस्ताव सादर केला जाणार आहे. त्या प्रस्तावावर आयुक्तांकडून योग्य कार्यवाही झाल्यानंतरच मुंबईतील शाळांचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पहा व्हिडिओ-
कोरोनाचा नवा व्हॅरिएंट आणि त्याची दहशत सर्वत्र पसरली असल्याने राज्यात १ डिसेंबरपासून पहिली ते चौथी आणि सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी संभ्रम निर्माण झाला आहे. अशातच मुंबई महापालिकेने शाळा सुरू करण्यासाठी सावध भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे राज्य आरोग्य सेवा संचालनालयाने शाळा सुरू करण्यासाठी रविवारी मार्गदर्शक सूचनाही जारी केल्याने मुंबईतील शाळसंदर्भात नेमका निर्णय कधी होणार, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
आरोग्य सेवा संचालनालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये राज्यातील सर्व शाळा, जिल्हे, महापालिका, नगरपालिका, छावणी बोर्ड, आदी शाळांचा समावेश करण्यात आला आहे. यात शाळांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये किमान सहा फुटांचे अंतर ठेवणे, मास्क वापरणे, हात धुणे, त्यासाठी प्रशिक्षण देणे आदी सूचना देण्यात आल्या आहेत, तर दुसरीकडे शिक्षकांच्या लसीकरणावरही भर देण्यात आला आहे.
शाळा उघडण्यापूर्वी कन्टेन्मेंट झोनमधील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शाळांत बोलावू नये, शाळांची संपूर्ण स्वच्छता करून घ्यावी. शाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरी घेतली जाऊ नये, शाळांमध्ये गर्दी होणार नाही असे कोणतेही खेळ, कार्यक्रम, उपक्रम आयोजित करू नयेत, आदी सूचना देण्यात आले आहेत. शाळा सुरू झाल्यावर ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत, अशाच शिक्षकेतर आदींना शाळांमध्ये प्रवेश दिला जावा. ज्या स्कूल बसने मुले येतात, त्यातही गर्दी केली जाऊ नये. कोविडमुळे मुलांच्या शिक्षकांच्या मानसिक आरोग्यावर कोणतेही परिणाम होणार नाहीत, त्यांना नैराश्य येणार नाही, यासाठी समुपदेशनाची व्यवस्थाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जे विद्यार्थी क्वारंटाईन होतील, त्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाची सोय उपलब्ध करून द्यावी, शाळेतील कोणालाही कोविडची लक्षणे दिसू लागल्यास त्या व्यक्ती अथवा विद्यार्थ्यांसोबत भेदभावाची वागणूक दिली जाऊ नये, अशाही सूचना आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिले आहेत.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.