Sanjay Raut Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut: मी नक्कीच परत येईल...; संजय राऊतांचं तुरुंगातून आईला भावनिक पत्र

'आताच माझी ईडी कोठडी संपली. न्यायालयीन कोठडीत जाण्याआधी कोर्टाच्या बाहेरील बाकड्यावर बसून तुला हे पत्र लिहीत आहे. तुला पत्र लिहिण्याचा प्रसंग अनेक वर्षांनी आलाय.'

Jagdish Patil

रश्मी पुराणिक -

मुंबई: शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या रोखठोक लिखाणाची शैली अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. राजकारणावर सडेतोड लिखाण करणाऱ्या संजय राऊतांनी आईला लिहिलेलं भावनिक पत्र समोर आलं आहे. तरुंगातून लिहिलेल्या या पत्रामध्ये त्यांनी आपल्या आईला मी नक्की परत येईन अशा विश्वास दिला आहे. शिवाय महाराष्ट्र आणि आपल्या देशाचा आत्मा सहज कुणाला मारता येणार नाही असं देखील त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.

राऊतांनी लिहलेल्या पत्रातील मजकूर पुढीलप्रमाणे, खूप वर्ष पत्र लिहिण्याचा प्रसंग आला नाही. रोज सामना साठी अग्रलेख लिहीत होतो. स्तंभ लिहीत होतो, पण दौन्यावर नसेन तेव्हा तू आणि मी रोजच भेटत होतो. दौऱ्यावर असताना सकाळ संध्याकाळ फोनवर बोलत होतो. त्यामुळे तुला सविस्तर पत्र लिहायचे राहून गेले. आता हे पत्र लिहिण्याची संधी केंद्र सरकारने (Central Govt) दिली.

पाहा व्हिडीओ -

आताच माझी ईडी कोठडी संपली. न्यायालयीन कोठडीत जाण्याआधी कोर्टाच्या बाहेरील बाकड्यावर बसून तुला हे पत्र लिहीत आहे. तुला पत्र लिहिण्याचा प्रसंग अनेक वर्षांनी आलाय. 'ईडी'चे अधिकारी घरी घुसले तेव्हा तू मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोखाली खंबीरपणे बसून होतीस. (Sanjay Raut wrote a letter to his mother from jail)

तुझ्या खोलीची व देवघराची, तसेच किचनमधील मीठ, मसाले, पिठांच्या डब्यांची झडती घेतली तेव्हाही तू करारी मुद्रेने सर्व सहन करत होतीस, हा प्रसंग आपल्यावर येणारच आहे हे तू बहुधा मनात पक्के केले होतेस. पण संध्याकाळी मला घेऊन जाताना तू मला मिठी मारलीस व रडलीस. तुला अचानक हुंदका फुटला! बाहेर असंख्य शिवसैनिक घोषणा देत होते.

त्या गर्जनांतही तुझा हुंदका माझ्या मनात घुसला. 'लवकर परत ये' म्हणालीस. खिडकीतून मला हात केलास. जसा तू रोज 'सामना'त किंवा दौन्यावर जाताना करतेस. त्या कठीण परिस्थितीतही अश्रू रोखून तू बाहेर जमलेल्या शिवसैनिकांनाही हात केलास. मला घेऊन जाणारी गाडी बाहेर पडेपर्यंत तुझा हात वरच होता.

आई, मी नक्कीच परत येईन. महाराष्ट्र आणि आपल्या देशाचा आत्मा असा सहजच कोणाला मारता येणार नाही. देशासाठी लढणारे हजारो सैनिक सीमेवर उभे असतात आणि ते महिनोन महिने घरी येत नाहीत. काही जण तर कधीच येत नाहीत. लढाई तर अशीच असते. मलाही अन्यायापुढे, शिवसेनेच्या म्हणजे महाराष्ट्राच्या दुश्मनांपुढे झुकता येत नाही. अन्यायाविरोधात मी लढा देत आहे.

म्हणूनच मला तुझ्यापासून दूर जावे लागले. हा कणखरपणा व कठोरपणा मी तुझ्याकडूनच घेतला नाही काय? भुजबळ, राणे शिवसेना सोडून गेले तेव्हाही तुझ्यातला त्रागा मी पाहिलाय. आता पुन्हा शिंदे नावाचा गट फुटून उद्धव ठाकरेंवर हल्ले करू लागला तेव्हा "काहीतरी करा, शिवसेना वाचवा!" असे सांगणारी तूच होतीस. "हे लोक का फुटले? यांना काय कमी पडलं होतं?" असा प्रश्नही तू बातम्या पाहून विचारीत होतीस. शिवसेना वाचवायची, टिकवायची म्हणजे लढावेच लागेल. प्रत्येक वेळेस वीर शिवाजी शेजाऱ्यांच्याच घरात का जन्माला यावा? हा प्रश्न असतोच,

शिवसेनेचे व स्वाभिमानाचे बाळकडू मी तुझ्याकडूनच घेतले. महाठी बाणा मी तुझ्याकडूनच शिकलो. शिवसेनेशी व बाळासाहेबांशी कधीच बेइमानी करायची नाही, हे तूच आमच्या मनावर कोरलेस! मग आता त्या मूल्यांसाठी लढण्याची वेळ आली आणि त्यात 'संजय' कमजोर पडला, शरण गेला तर बाहेर काय तोंड दाखवू? मी गुडघे टेकलेले तुलाच मान्य झाले नसते. 'ईडी', 'इन्कम टॅक्स' वगैरेच्या भयाने बरेच आमदार खासदार शिवसेना सोडून गेले. मला बेइमानांच्या यादीत जायचे नाही. कोणीतरी खंबीरपणे उभे राहायलाच हवे. माझ्यात ती हिंमत आहे. ती हिंमत माननीय बाळासाहेब आणि तू दिलीस.

सगळ्यांना माहीत आहे, माझ्यावर बनावट व खोटे आरोप लावले. इथे माझ्यासमोर तू अनेकांकडून दहशत व दबावाने अगदी 'गन पॉइंट वर माझ्याविरुद्ध बोगस स्टेटमेंट घेतल्या जात आहेत. अप्रत्यक्षपणे ठाकत्र्यांची साथ सोडा असे सुचवले जात आहे. याच प्रकारचा जुलूम टिळक, सावरकरांसह अनेकांना भोगावा लागला. अनेक शिवसैनिकांनी पक्षासाठी आपल्या घरादारांवर तुळशीपत्र ठेवले, जायबंदी झाले, प्राण गमावले. मग तोच पक्ष संकटात असताना माझ्यासारख्या त्यांच्या नेत्याने रणांगणातून पळ कसा काढावा? का झुकावे? उद्धव ठाकरे हे माझे जिवाभावाचे मित्र व सेनापती आहेत. अशा कठीण काळात मी त्यांना सोडले तर मी उद्या बाळासाहेबांना काय तोंड दाखवू?

आज कारस्थानी लोकांच्या हाती राजशकट सापडले आहे. त्यांना शिवसेनेचे अस्तित्व व महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवायचा आहे. पडद्यामागे बरेच काही चालले आहे. अशा वेळी मान खाली घालून, हात बांधून एखाद्या गुलामासारखे कसे जगता येईल? मी आताच ऐकले, 'नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया व राहुल गांधींचाही छळ सुरू आहे. रोहित पवार यांनाही त्रास दिला जातोय. या छळातूनच नव्या क्रांतीच्या ठिणग्या उडतील व नव्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होईल. लोकशाहीचा पुन्हा जन्म होईल.

जशी तू माझी आई आहेस तशी शिवसेनादेखील आपल्या सगळ्यांची आई आहे. आईशी बेइमानी करण्यासाठी माझ्यावर दबाव होता. सरकारविरुद्ध बोलू नका, महाग पडेल, अशा धमक्या होत्या. हा दबाव आणि धमक्यांना मी भीक घातली नाही या एकाच कारणासाठी मी आज तुझ्यापासून लांब आहे. तरीही चिंता नसावी, मी येईनच. तोपर्यंत उद्धव ठाकरे व असंख्य शिवसैनिक तुझी मुले असतील. काळजी घे!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पुण्यातल्या नवले ब्रिजवर दोन चारचाकी वाहनांचा अपघात; ३ जण गंभीर जखमी

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

SCROLL FOR NEXT